धाराशिव: दुष्काळी दौऱ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या गाडीत एकत्र बसून ‘सभ्यतेचा’ आणि ‘विकासाचा’ आव आणणाऱ्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा खरा राजकीय चेहरा आता चव्हाट्यावर आला आहे. समोर गोड बोलायचं आणि पाठीमागून स्वतःच्या पुत्राच्या माध्यमातून घाणेरडं राजकारण खेळायचं, असा गंभीर घणाघात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला असून, थेट राणा पाटलांच्या घरात घुसून त्यांच्या ‘काळ्या साम्राज्या’वर राजकीय सर्जिकल स्ट्राईक केला आहे.
मंत्रिपदाचा काळा पैसा अन् पुत्राच्या हातात विकृतीची सूत्रे!
ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांसमोर राणा पाटलांची अक्षरशः पिसं काढली. “मंत्रिपदाच्या काळात जो प्रचंड काळा पैसा गोळा केला, त्या पैशातून आज राणा पाटलांच्या घरात विकृती पोसली जात आहे,” असा थेट आरोप ओमराजेंनी केला. राणा पाटलांचे सुपुत्र मल्हार पाटील हे धाराशिव, पुणे आणि मुंबई अशा तीन ठिकाणी हायटेक ‘वॉर रूम’ चालवत असून तिथूनच विरोधकांना टार्गेट करण्यासाठी भाडोत्री ट्रोल आर्मी चालवली जात असल्याचा पर्दाफाश त्यांनी केला.
“समोर उभं राहून लढायची हिंमत नाही, म्हणूनच पुत्राला पुढे करून अश्लील शब्दांत ट्रोलिंग करणे, घाणेरड्या कमेंट्स करवणे आणि सोशल मीडियावर धमक्या देणे हेच राणा पाटलांच्या घराण्याचे संस्कार आहेत का?” असा तिखट सवाल ओमराजेंनी उपस्थित केला.
सत्तेची मस्ती, पोलिसांवर दबाव अन् दडपशाही
राणा पाटलांच्या राजकारणावर कोरडे ओढताना ओमराजे म्हणाले की, “यांच्या कारभाराविरोधात कुणी चकार शब्द काढला, की लगेच सत्तेचा माज दाखवला जातो. पोलिसांवर दबाव टाकून सामान्य लोकांवर आणि विरोधकांवर खोट्या केसेस दाखल करायच्या, ही राणा पाटलांची ठरलेली कार्यपद्धती आहे. स्वतःच्या पापांवर पांघरूण घालण्यासाठी जनतेच्या हक्काचा पैसा अशा घाणेरड्या कामांसाठी उधळला जातोय.”
‘गाडीतले सख्य’ की जनतेच्या डोळ्यात धूळफेक?
मुख्यमंत्र्यांच्या गाडीत एकत्र बसण्यावरून सोशल मीडियावर सुरू झालेल्या चर्चेमागचा खरा सूत्रधार राणा पाटलांचाच गट असल्याचा रोख ओमराजेंनी स्पष्ट केला. दुष्काळासारख्या गंभीर विषयावरही केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच्या ट्रोल गँगकडून घाणेरडा प्रचार चालवणाऱ्या राणा पाटलांची ही विकृती जिल्ह्याने उघड्या डोळ्यांनी पाहिली आहे.
ओमराजेंनी थेट आर्थिक नाडी आणि कौटुंबिक राजकारणावर बोट ठेवल्याने आता राणा पाटील बॅकफूटवर गेले असून, या गंभीर आरोपांवर ते आणि त्यांचे सुपुत्र काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.





