धाराशिव: उत्स्फूर्त लोकसहभागातून राबवल्या जाणाऱ्या ‘हरित धाराशिव २.०’ या १० लक्ष वृक्ष लागवड मोहिमेला आता ‘तांत्रिक अडचणींचे’ मोठे ग्रहण लागले आहे. गिनीज बुकमध्ये नोंद करण्यासाठी प्रशासनाने आणलेल्या ॲपचा अक्षरशः बोजवारा उडाला असून, उन्हातान्हात राबून झाडे लावणाऱ्या स्वयंसेवकांच्या पदरी मात्र निराशा आणि संताप पडत आहे.
नेमका तांत्रिक गोंधळ काय?
मुरूम येथील स्वयंसेवक संतोष चिलोबा यांनी प्रशासनाच्या या हायटेक मोहिमेतील ‘लो-टेक’ सत्य समोर आणले आहे. त्यांच्या अनुभवानुसार, प्रत्यक्ष खड्डा खोदून झाड लावण्यापेक्षा, त्याची ऑनलाइन नोंदणी करणे हे सर्वाधिक डोकेदुखीचे काम बनले आहे.
- स्कॅनिंगचा कासवगती वेग: झाडांवर लावलेले QR कोड लवकर स्कॅनच होत नाहीत. प्रत्येक स्वयंसेवकाला ३०० झाडे स्कॅन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात तासभर खपूनही जेमतेम ३० झाडे स्कॅन करण्यातच नाकीनऊ येत आहेत.
- नंबर माझा, नाव दुसऱ्याचे!: संतोष चिलोबा यांनी त्यांच्या स्वतःच्या नंबरवरून ॲपमध्ये लॉगिन केले. सुरुवातीला सर्व ठीक होते, पण त्यानंतर अचानक ॲपवर ‘Error’ दिसू लागला आणि त्यांच्या प्रोफाईलवर किशोर भागवत गायकवाड हे नाव झळकू लागले! मोबाईल नंबर चिलोबा यांचा, पण सिस्टिमवर नाव मात्र दुसऱ्याचेच, यामुळे गोंधळ उडाला आहे.
- क्रेडिट कोणाला? आकड्यांचा खेळ: प्रत्यक्षात जेवढी झाडे लावली आहेत, त्यापेक्षा पूर्णपणे वेगवेगळे आकडे सिस्टिमवर दिसत आहेत. यामुळे नेमकी किती झाडे लागली आणि त्या कष्टाचे ‘क्रेडिट’ नेमके कोणाला मिळणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुरूममध्ये झाड, लोकेशन मात्र वाशीचे!
या ॲपचा सगळ्यात मोठा ‘कहर’ म्हणजे लोकेशनचा झोल. चिलोबा यांनी विठ्ठलसाई साखर कारखाना (मुरूम) परिसरात झाडे लावली आणि स्कॅन केली. मात्र, ॲपवर त्या झाडांचे लोकेशन चक्क वाशी तालुक्यात दाखवत होते!
उत्स्फूर्तपणे सहभागी होणाऱ्या नागरिकांचा उत्साह प्रशासनाच्या या तांत्रिक ढिसाळपणामुळे मावळत आहे.
मग अचूक रेकॉर्ड कसा तयार होणार?
एकीकडे १० लाख वृक्ष लागवडीचे आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे ढोल पिटले जात आहेत, तर दुसरीकडे सरकारी सिस्टिममध्येच अशा चुकीच्या नोंदी होत आहेत. जर ॲपमध्येच एवढ्या भयंकर त्रुटी असतील, तर लागवड झालेल्या झाडांची अचूक आकडेवारी सरकारी रेकॉर्डमध्ये कशी दिसणार? आणि या सदोष आकडेवारीच्या आधारावर रेकॉर्ड कसा ग्राह्य धरला जाणार? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.




