धाराशिव: सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांविरोधात धाराशिव जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांनी कारवाई केली आहे. १४ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत धाराशिव शहर, भूम, आनंदनगर, मुरुम, नळदुर्ग आणि कळंब पोलीस ठाण्यांच्या हद्दीत भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५ अन्वये एकूण १४ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धाराशिव शहरात पाच वाहनांवर कारवाई
धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.४० ते सायंकाळी ५.४० या वेळेत सार्वजनिक रस्त्यावर वाहतूक धोकादायक पद्धतीने वाहने उभी असल्याचे आढळून आले.
ताज चौक-दर्गा रोड, पाथरूड चौक-आगड गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील धाराशिव-तुळजापूर रस्ता आणि डीसीसी बँकेसमोरील रस्त्यावर जीप, ॲपे रिक्षा, छोटा हत्ती, ॲपे लोड केअर वाहन आणि रिक्षा अशी पाच वाहने धोकादायकरीत्या उभी असल्याचे पोलिसांना आढळले.
याप्रकरणी अनिल दामोदर बनसोडे, आयुब शमशोद्दीन शेख, दिलीप लिंबराज लांडगे आणि हराण शेरखान पठाण यांच्याविरुद्ध कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रमाईनगर येथील उड्डाणपुलाखाली तसेच पानटपरी कॉलेज ते शिंगोली रेस्ट हाउसकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक धोकादायकरीत्या हातगाडे उभे केल्याचे आढळले.
याप्रकरणी मनिषा दत्तात्रय ओव्हळ आणि सतीश शंकर गिरी यांच्याविरुद्ध कलम २८५ अन्वये स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भूममध्ये तीन गुन्हे
भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीतही १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० ते सायंकाळी ६.४५ या कालावधीत तीन वाहने सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभी असल्याचे आढळले.
गोलाई चौक, फ्लोरा चौक आणि तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या दुकानासमोरील रस्त्यावर पिकअप व सुमो वाहने उभी केल्याप्रकरणी अविनाश श्रीराम शिंदे, सौदागर जयसिंग काळे आणि गोरक्षनाथ मधुकर टेकाळे यांच्याविरुद्ध स्वतंत्र तीन गुन्हे दाखल करण्यात आले.
मुरुममध्ये सात गुन्हे
मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीतही मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० ते दुपारी २.३० या कालावधीत बसस्थानकासमोर, मुरुम मोड ते मुरुम एनएच-६५ रस्त्यालगत, मरीआई चौक येणेगुर आणि नाईकनगर बसस्थानकासमोर सार्वजनिक रस्त्यावर ॲपे रिक्षा धोकादायकरीत्या उभ्या असल्याचे पोलिसांना आढळले.
या कारवाईत जैनोदीन मोहिदीन ईनामदार, तानाजी बब्रुवान कांबळे, प्रेमसागर गणपतराव गुंमटे, नरेश दगडू हेडे, जयसिंग व्यंकटसिंग राजपूत, ज्ञानेश्वर वसंत सोनटक्के आणि अहमद अलीम शेख यांच्याविरुद्ध स्वतंत्र सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नळदुर्ग आणि कळंबमध्येही कारवाई
नळदुर्ग बसस्थानकाच्या पूर्वेकडील गेटसमोरील एनएच-६५ रस्त्यावर ऑटो रिक्षा धोकादायकरीत्या उभी केल्याप्रकरणी निजाम नबीलाल शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तर कळंब शहरातील होळकर चौकात कळंब-येरमाळा रस्त्यावर छोटा हत्ती वाहन रहदारीस धोका निर्माण होईल अशा पद्धतीने उभे केल्याप्रकरणी राहुल भिका बचुटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, संबंधित पोलीस ठाण्यांकडून पुढील कारवाई सुरू आहे.



