धाराशिव – तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोलनाक्याजवळील दुकाने, हॉटेल्स आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांवर बुलडोझर चालवून स्वतःच्या रिसॉर्टचा रस्ता मोकळा केला जात असल्याच्या आरोपावरून काँग्रेस आता थेट रस्त्यावर उतरणार आहे. या कारवाईविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून येत्या २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तामलवाडी टोलनाका परिसरात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती काँग्रेसचे धाराशिव जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.
उमेश राजेनिंबाळकर यांची घोषणा; आंदोलनाची हाक
जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी या कारवाईचा तीव्र निषेध करत म्हटले की, “पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मर्जीखातर गरिबांचा रोजगार उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला जात आहे. महामार्गावर वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या छोट्या दुकानदारांवर आणि शेतकऱ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही. या अन्यायाविरोधात २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सोबत घेऊन काँग्रेसच्या वतीने धडक आंदोलन करण्यात येईल.”
काय आहे नेमके प्रकरण?
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच तामलवाडी टोलनाक्याला भेट देऊन अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती. या बैठकीनंतर त्यांनी परिसरातील अतिक्रमणे हटवण्याचे आणि महामार्गालगतचे सार्वजनिक स्वच्छतागृह पाडण्याचे निर्देश ‘आयआरबी’ (IRB) कंपनीला दिले होते. या निर्णयामुळे परिसरातील सुमारे ६० स्थानिक दुकानदार आणि हॉटेलचालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
याच मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पालकमंत्र्यांवर थेट निशाणा साधला होता. “पालकमंत्री प्रताप सरनाईकांचा ‘विकास’ नेमका कुणासाठी? स्वतःच्या २० एकर हायवे-टच जमिनीवर रिसॉर्ट उभारण्यासाठीच गरिबांच्या पोटावर पाय देऊन हा सोयीस्कर बुलडोझर न्याय चालवला जात आहे का?” असा खरमरीत सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला होता.
पालकमंत्र्यांचे स्पष्टीकरण
दरम्यान, या वादावर स्पष्टीकरण देताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या जमिनीवर रिसॉर्ट नसून फळबाग विकसित करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, स्थानिक दुकानदारांच्या रोजगाराला आपला विरोध नसून आयआरबी कंपनीने त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
धाराशिवचे राजकीय वातावरण तापले
प्रदेशाध्यक्षांच्या आरोपानंतर आता स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी थेट आंदोलनाची तारीख जाहीर केल्यामुळे या प्रकरणाला मोठे राजकीय वळण लागले आहे. २१ ऑगस्टच्या या आंदोलनामुळे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर मोठा दबाव निर्माण होण्याची शक्यता असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या आंदोलनाकडे लागले आहे.





