तुळजापूर: आई तुळजाभवानीचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर शहरात मटका, जुगार, आणि अवैध दारूचा महापूर आलाय, पण स्थानिक पोलीस प्रशासन मात्र केवळ निवेदने स्वीकारून ती फाईलमध्ये बंद करून ठेवण्यातच धन्यता मानत असल्याचे चित्र आहे! शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी भाजपचे नगराध्यक्ष विनोद (पिटू) विलासराव गंगणे यांनी २४ ऑगस्ट २०२६ रोजी पोलिसांना पुन्हा एकदा ३ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. पण पोलिसांचा मागील ट्रॅक रेकॉर्ड पाहता, हा इशारा म्हणजे केवळ आणखी एक कागदी घोडा ठरणार की काय, अशी खोचक चर्चा शहरात रंगली आहे.
निवेदनांची ‘हॅट्रिक’ तरीही कारवाई ‘शून्य’
तुळजापुरात अवैध धंद्यांविरोधात निवेदन देण्याचा हा काही पहिलाच ‘इव्हेंट’ नाही. प्रशासनाच्या उदासीनतेची क्रोनोलॉजी पाहिली तर परिस्थिती किती गंभीर आहे, हे लक्षात येते:
-
सहा महिन्यांपूर्वी: स्वतः नगराध्यक्षांच्या भावजय आणि नगरसेविका प्रियंका विजय गंगणे यांनी प्रशासनाला असेच एक निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती.
-
तीन महिन्यांपूर्वी: खुद्द नगराध्यक्षांनी असाच इशारा देऊन पोलिसांना जागे करण्याचा प्रयत्न केला होता.
-
मागील महिन्यात: सामाजिक कार्यकर्ते पंकज शहाणे आणि त्यांच्या मित्र परिवाराने तर थेट तहसील कार्यालयासमोर सलग आठ दिवस लाक्षणिक उपोषण केले आणि अवैध धंदे बंद करण्याची आर्त हाक दिली.
एवढे सगळे होऊनही शहरात अवैध धंद्यांचा ‘बाजार’ मात्र तेजीतच आहे.
पीआय साहेबांची निष्क्रियता अन् एसपी मॅडमचे मौन
या संपूर्ण प्रकाराचे केंद्रबिंदू ठरत आहेत ते पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे. मांजरे साहेब स्वतः अत्यंत तत्परतेने निवेदने स्वीकारतात, पण पुढे कारवाईच्या नावाखाली त्यांच्याकडून ‘शून्य’ प्रगती असते. त्यांच्या याच निष्क्रिय कारभारामुळेच शहरात अवैध धंद्यांचे पेव फुटले आहे.
सर्वांत आश्चर्याची आणि संतापाची बाब म्हणजे, जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक (SP) मॅडम रितू खोखर या सर्व प्रकाराकडे केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. शहरात एवढा गदारोळ सुरू असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हे मौन अवैध धंदेवाल्यांना मूक संमती तर देत नाही ना, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
नव्या निवेदनात दडलंय काय?
नगराध्यक्ष गंगणे यांनी दिलेल्या ताज्या लेखी निवेदनानुसार:
-
मटका, जुगार, हातभट्टी आणि ताडी विक्रीचे अवैध व्यवसाय तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
-
येत्या ३ दिवसांत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन कागदपत्रे तपासावीत आणि थेट मूळ मालकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी सक्त ताकीद दिली आहे.
-
कारवाई न झाल्यास, सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यासमोरच उपोषण करू, असा थेट इशारा त्यांनी या पत्राद्वारे दिला आहे.
आता पीआय मांजरे या नव्या निवेदनाचेही ‘कागदी विमान’ करणार की प्रत्यक्षात खाकीचा धाक दाखवून कारवाईचा बडगा उगारणार? याकडेच तमाम तुळजापूरकरांचे लक्ष लागले आहे.
इनसाईड स्टोरी: निवेदनामागचे खरे कारण काय?
शहरात अचानक अवैध धंद्यांचा पुळका का आला, याची काही धक्कादायक कारणे आता उघड होत आहेत:
-
विरोधकांचे मटका कनेक्शन: तुळजापूर नगरपालिकेतील विरोधी गटातील काही नगरसेवकच शहरात मटक्याचे बुकी चालवत असल्याची खमंग चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
-
राजकीय खेळी: विरोधकांच्या याच मटक्याच्या धंद्याला चाप लावण्यासाठी आणि त्यांना राजकीय कोंडीत पकडण्यासाठीच नगराध्यक्ष गंगणे यांनी हे कारवाईचे अस्त्र उपसल्याचे बोलले जात आहे.





