उमरगा – महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व सुगंधी तंबाखूची कारमधून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या बीड येथील दोघांना उमरगा पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले आहे. तलमोड चेकपोस्टवर करण्यात आलेल्या या धडक कारवाईत २ लाख ७४ हजार रुपयांचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण ५ लाख ७४ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी कारवाई कशी झाली?
स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक MH 14 GD 1337) मधून अवैध गुटख्याची मोठी खेप नेली जात असल्याची गोपनीय माहिती उमरगा पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच पथकाने राष्ट्रीय महामार्गावरील तलमोड चेकपोस्ट येथे तातडीने नाकाबंदी लावली.
दुपारी १२.३५ वाजेच्या सुमारास संशयित स्विफ्ट डिझायर कार येताच पोलिसांनी तिला अडवले. कारची झडती घेतली असता कारमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला खालील अन्नपदार्थांचा साठा मिळून आला:
-
हिरा पान मसाला : १,८९० पुडे
-
रॉयल ७१७ सुगंधी तंबाखू : १,५७५ पुडे
-
जप्त गुटख्याची किंमत : २,७४,०५० रुपये
-
स्विफ्ट डिझायरसह एकूण मुद्देमाल : ५,७४,०५० रुपये
बीडच्या दोघांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिसांनी कार चालक शेख रेहान शेख रहिम (वय ३१ वर्षे, रा. हुजरा मस्जिदजवळ, मोमीनपुरा, ता. जि. बीड) आणि त्याचा सहकारी सय्यद अफरोज सय्यद सलीम (वय २८ वर्षे, रा. मोहम्मादिया कॉलनी, मोमीनपुरा, ता. जि. बीड) या दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याविरुद्ध १५ सप्टेंबर २०२६ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात खालील कायद्यांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे:
-
अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६: कलम २६(२)(iv), २७(३)(डी), २७(३)(ई), ३०(२)(अ), ५९
-
भारतीय न्याय संहिता (BNS): कलम १२३, २२३, २७४ आणि २७५
पोलीस पथकाची धडक कारवाई
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व त्यांच्या पथकाने पार पाडली. गुटखा माफियांवर केलेल्या या कारवाईमुळे अवैध वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.



