नमस्कार वाचकहो! ‘धाराशिव लाइव्ह’च्या या भन्नाट मालिकेत तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. धाराशिव जिल्ह्याला दुष्काळ काही नवीन नाही, तो तर जिल्ह्याच्या पाचवीलाच पुजला आहे. गेली दोन वर्षे ओल्या दुष्काळाने शेतकऱ्याला मारले, आणि यंदा २०२६ च्या खरीप हंगामात पावसाचा थेंब नसल्याने ‘कोरड्या दुष्काळाने’ सोयाबीन जागेवरच वाळून गेले आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
पण अशा भयानक परिस्थितीतही आपले ‘फेसबुक पिंट्या’ साहेब स्वतःचा ‘इव्हेंट’ कसा मॅनेज करतात आणि खोट्या घोषणांचा पाऊस कसा पाडतात, याचा हा नवा आणि संतापजनक अंक!
१. टेबलावरचे ‘सोयाबीन’ अन् साहेबांचा व्हीआयपी इव्हेंट!
परवा राज्याचे मुख्यमंत्री ‘देवाभाऊ’ धाराशिव जिल्ह्यातील या भयंकर कोरड्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आले होते. नियमानुसार त्यांनी बांधावर जाऊन, भेगाळलेल्या जमिनीत उभे राहून शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे अपेक्षित होते. पण फेसबुक पिंट्या साहेबांनी इथेही आपला ‘व्हीआयपी (VIP) इव्हेंट’ घडवून आणला!
साहेबांनी चक्क एका चकचकीत टेबलावर वाळलेले सोयाबीन ठेवून मुख्यमंत्र्यांना त्याची ‘पाहणी’ करायला लावली! अरे साहेब, जर तुम्हाला टेबलावरच सोयाबीन दाखवायचे होते, तर ते एका पुडक्यात बांधून थेट मुंबईला ‘पार्सल’ का नाही पाठवले? उगीच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे आणि हेलिकॉप्टरचे सरकारी करोडो रुपये तरी वाचले असते!
२. शेतकऱ्यांना धक्काबुक्की: साहेबांचा खरा चेहरा उघडा!
एकिकडे टेबलावर सोयाबीन ठेवून मुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचा देखावा साहेब करत होते, तर दुसरीकडे जेव्हा खऱ्या आणि गांजलेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा साहेबांचा खरा चेहरा उघडा पडला.
मुख्यमंत्र्यांसमोरच फेसबुक पिंट्या साहेबांनी शेतकऱ्यांना अत्यंत उद्धटपणे ‘धक्काबुक्की’ केली! शेतकऱ्यांना अक्षरशः ढकलून देण्याचा साहेबांचा हा संतापजनक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी फिरत आहे. साहेब, जे हात तुम्हाला मतपेटीतून निवडून देतात, त्याच हातांना तुम्ही असे झिडकारणार?
३. सरकारचा ‘प्रवक्ता’ अन् ४० हजारांचे नवे गाजर!
शेतकऱ्यांना धक्के मारून झाल्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी साहेबांनी लगेच स्वतःला ‘सरकारचा प्रवक्ता’ घोषित केले आणि फेसबुकवर एक नवी, भलीमोठी पुडी सोडली!
साहेबांची नवी घोषणा बघा: “सोयाबीन पीक विमा: ४०,००० रुपये प्रति हेक्टरपेक्षा जास्त सरसकट मिळवून देण्यावर आपला भर! अनुदानासाठी पीक पंचनामे तातडीने सुरू होणार!” म्हणजे बघा, ज्या साहेबांना पंचनाम्याचा साधा मुहूर्त काढता आला नव्हता, ते साहेब थेट ‘४० हजार रुपये प्रति हेक्टर’ विम्याचे गाजर हवेत लटकवत आहेत!
४. जुन्या विम्यावर ‘मूग गिळून गप्प’!
साहेबांनी ४० हजारांचे स्वप्न तर दाखवले, पण वास्तवाच्या जमिनीवर सत्य काय आहे?
-
२०२० चा पीक विमा: धाराशिवच्या शेतकऱ्यांना २०२० चा पीक विमा अद्याप मिळालेला नाही, तो अजूनही सुप्रीम कोर्टात अडकून पडला आहे. विशेष म्हणजे, यातील राज्य सरकारचा ‘१३९ कोटी’ रुपयांचा वाटा शेतकऱ्यांना वाटप करायला कोणीही हरकत घेतलेली नाही, पण तरीही साहेब ते पैसे शेतकऱ्यांना मिळवून देऊ शकले नाहीत.
-
२०२५ चा पीक विमा: गेल्या वर्षी (२०२५ मध्ये) जिल्ह्यातील तब्बल १४ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विम्याचा एक रुपयाही मिळाला नाही!
ज्या साहेबांना २०२० आणि २०२५ चा हक्काचा पीक विमा अजूनही मिळवून देता आलेला नाही, आणि ज्यावर ते आजतागायत पूर्णपणे गप्प आहेत (ब्र शब्दही काढत नाहीत), तेच साहेब आता थेट २०२६ मध्ये ४० हजारांच्या सरसकट विम्याची हवा भरत आहेत!
तात्पर्य: फेसबुक पिंट्या साहेब, तुम्ही टेबलावर सोयाबीन ठेवून कितीही फोटो काढा आणि ४० हजारांच्या कितीही घोषणा करा… पण तुमचा शेतकऱ्यांना धक्के मारणारा हात आणि जुन्या विम्यावरचे तुमचे मौन, या कोरड्या दुष्काळात शेतकऱ्यांच्या बरोबर लक्षात राहील.
कारण विसरू नका… “यह पब्लिक है, सब जाणती है!”





