परंडा : कौटुंबिक वादातून पत्नीला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी तसेच चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना खासगाव येथे घडली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सासऱ्यावरही चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आबासाहेब देविदास पाटील (वय ३८, रा. खासगाव, ता. परंडा, जि. धाराशिव) याने १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास कौटुंबिक वादाच्या कारणावरून पत्नी सुप्रिया आबासाहेब पाटील (वय २५) यांना शिवीगाळ केली.
त्यानंतर आरोपीने पत्नीला लाथाबुक्यांनी मारहाण करत चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार सुरू असताना सुप्रिया यांचे वडील दत्तात्रय मोटे हे भांडण सोडवण्यासाठी आले. त्यावेळी आरोपीने त्यांच्यावरही चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे.
याशिवाय आरोपीने दोघांना जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सुप्रिया पाटील यांनी १ नोव्हेंबर रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून परंडा पोलीस ठाण्यात आरोपी आबासाहेब पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलीस करीत आहेत.


