उमरगा : “बहिणीशी बोलू नको म्हणून सांगणारा तू कोण?” असा जाब विचारत एका १८ वर्षीय तरुणासह त्याच्या भावजीवर काचेची बाटली आणि हंटर बेल्टने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना उमरगा तालुक्यातील डिग्गी येथे घडली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात एका मुख्य आरोपीसह इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डिग्गी (ता. उमरगा, जि. धाराशिव) येथील रहिवासी आंबादास संगमेश्वर वाघमारे (वय १८ वर्षे) आणि त्यांचे भावजी हे १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास गावात असताना हा प्रकार घडला. गावातीलच संशयित आरोपी शानू विजयकुमार माळगे आणि त्याचे इतर तीन साथीदार यांनी त्यांना गाठून “बहिणीस बोलू नको म्हणून सांगणारा तू कोण?” या कारणावरून वाद उकरून काढला.
यानंतर चौघांनी संगनमत करून आंबादास वाघमारे व त्यांच्या भावजीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी दोघांना लाथाबुक्क्यांसह काचेची बाटली आणि हंटर बेल्टने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, आरोपींनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.
उपचारानंतर आंबादास वाघमारे यांनी १६ नोव्हेंबर रोजी उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून उमरगा पोलिसांनी मुख्य आरोपी शानू विजयकुमार माळगे आणि त्याच्या इतर तीन साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१) (धोकादायक साधनाने गंभीर दुखापत करणे), ११५(२) (स्वेच्छेने दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान), ३५१(२)(३) (जीवे मारण्याची धमकी) आणि ३(५) (समान उद्देशाने एकत्रित गुन्हा करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.




