धाराशिव – नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा सुधाकर फड यांनी मुख्यालयी न राहता दरमहा घरभाडे भत्ता उचलून शासकीय रकमेचा अपहार केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यासंदर्भात सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात फड या लातूर येथे वास्तव्यास असून त्यांचे वडील सुधाकर निवृत्ती फड यांच्या मालकीच्या खाजगी वाहनाने दररोज धाराशिव, बेंबळी, औसा, लातूर आणि परत धाराशिव असा प्रवास करतात, असा दावा करण्यात आला आहे. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ टोल नाक्यावरील अभिलेख आणि सीसीटीव्ही फुटेज तसेच फड यांचे मासिक वेतन देयक बिलाच्या छायांकित प्रती पुरावा म्हणून दाखल करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सुभेदार यांनी दिलेल्या पुराव्यांची पडताळणी करण्यात येत आहे. चौकशीच्या निकालांवर अवलंबून फड यांच्यावर कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी वसुधा सुधाकर फड यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा गैरवापर करून शासकीय रकमेचा अपहार केल्याचा हा गंभीर आरोप आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाल्यास अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.