धाराशिव: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आज धाराशिव येथे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना लवकर न्याय मिळावा आणि या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी केली.
“आम्हाला लवकर न्याय द्यावा,” अशी आर्त हाक वैभवी देशमुख यांनी यावेळी दिली. “या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना सहआरोपी करावे,” अशीही त्यांनी मागणी केली.या जन आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनीही या मोर्चात सहभाग घेतला.
जरांगेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात; मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. जरांगे म्हणाले, “धनंजय मुंडे आपल्या गुंडांच्या टोळीच्या माध्यमातून ओबीसीचे पांघरूण घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ते असेच करत राहिले, तर मराठा समाज सावध होईल. मुंडेंनी आपल्या गुंडांचा माज थांबवावा आणि आमच्या विरोधात ओबीसींना उभे करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील.”
जरांगेंनी मुंडेंचा उल्लेख “धन्या मुंडे” असा करत त्यांच्या वर्तनावर जोरदार हल्ला चढवला. “मी कधीच धन्या मुंडेचे नाव घेतले नाही, जो लोकांच्या पोरी छेडतो, आयाबहिणींचा अपमान करतो आणि खून करण्याचे आदेश देतो. पण ज्या दिवशी या लोकांनी धनंजय देशमुख यांना धमक्या दिल्या, त्याच दिवशी मी मुंडेंच्या विरोधात उभा राहिलो. मी एकदा पाठ सोडत नाही, हे माझे धोरण आहे,” असे जरांगे म्हणाले.
सुरेश धसांची अजित पवारांकडे मागणी – धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवा
धाराशिवमध्ये मस्साजोग हत्याकांड प्रकरणावर आयोजित जनआक्रोश आंदोलनात बोलताना आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली. धस म्हणाले, “धनंजय मुंडेंचे ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत फोटो आहेत. त्यामुळे अजित पवारांनी त्यांना मंत्रिपदावरून हटवून त्यांच्या जागी मनोज कायंदेला संधी द्यावी.”
सातपुडा बंगल्यावर बैठक घेणारा मंत्रीही आरोपी – धस
सुरेश धस यांनी बीड प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत धनंजय मुंडेंवरही गंभीर आरोप लावले. “या प्रकरणातील एका मुख्य आरोपीने 19 ऑक्टोबर रोजी सातपुडा या सरकारी बंगल्यावर बैठक घेतली होती. अशा व्यक्तीचा संबंध स्पष्ट असूनही तो कसा आरोपी नाही? हे पोलिसांनी समजावून सांगावे,” अशी मागणी धस यांनी केली.