तुळजापूर: तुळजापूरचे उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांना निलंबित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अहवालात त्यांनी जिल्हाधिकारी ओम्बासे यांच्यावर जातीय टिप्पणी आणि धमक्या देण्याचा आरोप केला होता. याप्रकरणी चौकशी सुरू असतानाच डव्हळे यांना निलंबित करण्यात आल्याने हा सूडबुद्धीने केलेला निर्णय असल्याचा आरोप होत आहे.
डव्हळे यांनी निवडणुकीदरम्यान दोन अहवाल निवडणूक आयोगाला पाठवले होते. या अहवालात ओम्बासे यांनी निवडणूक कामात अडथळा आणल्याचा, भ्रष्टाचार केल्याचा आणि जरांगे पाटलांनी उभ्या केलेल्या उमेदवाराला तुच्छ वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच ओम्बासे यांनी “इथे सर्व पाटीलच भरलीत” अशी जातीवाचक टिप्पणी केल्याचा आणि डव्हळे यांचे करियर उध्वस्त करण्याची धमकी दिल्याचा देखील आरोप करण्यात आला होता.
या अहवालांच्या आधारे निवडणूक आयोगाने चौकशी समिती गठीत केली होती. मात्र, चौकशी सुरू होण्यापूर्वीच डव्हळे यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे ओम्बासे यांनी आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी डव्हळे यांना निलंबित केल्याचा आरोप होत आहे.
या घटनेमुळे मराठा समाजात संतापाची लाट पसरली आहे. डव्हळे यांचे निलंबन रद्द करून जातीवादी जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.