धाराशिव : तेरखेडा येथील ५७ वर्षीय संजय विष्णु ठाकुर यांच्याकडून पोलिस असल्याची बतावणी करून २१,७३,९५२ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाकुर यांना १२ डिसेंबर २०२४ ते २१ डिसेंबर २०२४ या कालावधीत ८८८२१८४६८२ या क्रमांकावरून फोन आला होता. फोन करणाऱ्याने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून ठाकुर यांच्या आधार कार्डचा गैरवापर करून पार्सलद्वारे ड्रग्ज मागविल्याचे सांगितले. तसेच, या प्रकरणातून सुटका करण्यासाठी त्यांनी ठाकुर यांच्याकडून २१,७३,९५२ रुपये ऑनलाइन पद्धतीने उकळले.
ठाकुर यांनी १० जानेवारी २०२५ रोजी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३१८(४), २०४, ३४७(२) सह ६६(सी), ६६(डी) माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम २००८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.