उमरगा – उमरगा शहरातील कुंभार गल्लीत (औटी गल्ली) काळे कुटुंबातील जागेच्या वादातून हाणामारीची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांनी उमरगा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
पहिल्या तक्रारीनुसार, प्रकाश बालाजी काळे (वय २८) यांना केदार धनंजय काळे, आनंदराव नागोराव काळे आणि उमेश आनंदराव काळे यांनी जागेच्या वादातून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या प्रकाश यांचे भाऊ आकाश काळे यांनाही मारहाण करण्यात आली.
दुसऱ्या तक्रारीनुसार, आनंदराव नागोराव काळे (वय ७५) यांना आकाश बालाजी काळे आणि प्रकाश बालाजी काळे यांनी पोलीसात तक्रार देण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या आनंदराव यांचे नातू केदार काळे यांनाही मारहाण करण्यात आली.
दोन्ही तक्रारींमध्ये आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. उमरगा पोलिसांनी दोन्ही तक्रारींची नोंद घेत भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.