तुळजापूर: दुय्यम निबंधक कार्यालय तुळजापूर येथे बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पवनजीतकौर गिरवरसिंग सुखमणी आणि सतिश सोपानराव येरणाळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी तुळजापूर तहसीलदारांनी ८ जानेवारी रोजी तुळजापूर पोलिसात तक्रार दिली होती. मात्र, चार दिवस उलटूनही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या तक्रारीत तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी म्हटले आहे की, मागील आठवड्यात माझ्या कार्यालयात एका खाजगी इसम यांनी मौजे सिंदफळ येथील खरेदीखत तहसील कार्यालयाचे बनावट कागदपत्रे जोडून केल्याची तोंडी तक्रार करून सदर बनावट कागदपत्राची झेरॉक्स प्रत मला दाखविली होती. त्या अनुषंगाने कागदपत्राची पडताळणी करण्याकरिता मी सदरचा दस्त दुय्यम निबंधक कार्यालय, तुळजापूर यांचेकडून मागवून घेतला होता. सदर दस्ताचे अवलोकन केले असता त्यात पुढील बाबी निदर्शनास आलेल्या आहेत.
दुय्यम निबंधक कार्यालय तुळजापूर येथे खरेदीखत दस्त क्र. ६०३७/२०२४ हा दि. ०९/१२/२०२४ रोजी नोंदविला गेलेला आहे. यात लिहून देणार पवनजीतकौर गिरवरसिंग सुखमणी, वय ५४ वर्षे, धंदा-घरकाम, रा. हरिचरण अपार्टमेंट, शहानूरवाडी, क्रांती चौक, औरंगाबाद ४३१ ००५ हे असून लिहून घेणार सतिश सोपानराव येरणाळे, वय ५८ वर्षे, धंदा-व्यापार, रा. फ्लॅट नं. ३०२, माऊली अपार्टमेंट, सुतारवाडी पाशान पुणे ४११ ०२१ हे आहेत. लिहून देणार यांनी त्याचे नावे असलेली मौजे सिंदफळ ता. तुळजापूर भुमापन क्र. १७६ क्षेत्र ०१ हे २० आर याचे तहसीलदार तहसील कार्यालय तुळजापूर यांचे पत्र क्रमांक २०२२/जमा-२/सीआर/३९ दिनांक २८/१२/२०२२ अन्वये अकृषीची मंजूरी मिळाल्याचे नमूद केले आहे. दस्त क्रमांक ६०३७/२०२४ मध्ये तहसील कार्यालय तुळजापूर यांच्या कार्यालयाचे पत्र जोडले असून सदर पत्रावर श्रीमती योगिता कोल्हे, तहसीलदार या नावाने स्वाक्षरी केलेली आहे.
मात्र कार्यालयीन अभिलेखाचे अवलोकन केले असता अकृषिक आदेशाम नमूद केलेला दिनांक २८/१२/२०२२ रोजी श्रीमती योगिता कोल्हे या तहसील कार्यालय तुळजापूर येथे तहसीलदार या पदावर कार्यरत नव्हत्या. तसेच या दस्तात पुढे तहसील कार्यालय उस्मानाबाद यांचे कार्यालयीन पत्र जा.क्र.२०२२/जमा-२/सीआर/३९५ दिनांक २२/१२/२०२२ अन्वये मौजे सिंदफळ येथील सर्वे क्रमांक/गट क्रमांक १७६ क्षेत्र : १२००० चौ.मी दर्शवून अकृषिक आदेश झाल्याचे पत्र. जोडले आहे. सदर पत्रावरतील श्री. अविनाश कारडे, तहसीलदार – तुळजापूर या नावाने स्वाक्षरी केलेली आहे. कार्यालयीन अभिलेखाचे अवलोकन केले असता तुळजापूर येथे श्री. अविनाश कारडे या नावाची कोणीही व्यक्ती तहसीलदार म्हणून कार्यरत नव्हती. त्यावरून दस्त क्रमांक ६०३७/२०२४ नोंदविताना दस्त लिहून देणार व लिहून घेणार यांनी तहसील कार्यालय तुळजापूर या कार्यालयातून अकृषिक आदेश पारित झाल्याचे बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची व तहसील कार्यालय तुळजापूर यांची फसवणूक केलेली आहे. तसेच दस्त क्रमांक ६०३७/२०२४ हा दस्त दिनांक २७/१२/२०२४ रोजी लिहून देणार सतिश सोपानराव येरणाळे, वय ५८ वर्षे, धंदा-व्यापार, रा. फ्लॅट नं.३०२, माऊली अपार्टमेंट, सुतारवाडी पाशान पुणे ४११ ०२१ व लिहून घेणार पवनजीतकौर गिरवरसिंग सुखमणी, वय ५४ वर्षे, धंदा-घरकाम, रा. हरिचरण अपार्टमेंट, शहानूरवाडी, क्रांती चौक, औरंगाबाद ४३१ ००५ यांनी नोंदणीकृत रद्दपत्र क्रमांक ६४४४/२०२४ नोंदविलेला आहे.
त्यामुळे दस्त क्रमांक ६०३७/२०२४ मधील लिहून देणार पवनजीतकौर गिरवरसिंग सुखमणी, वय ५४ वर्षे, धंदा-घरकाम, रा. हरिचरण अपार्टमेंट, शहानूरवाडी, क्रांती चौक, औरंगाबाद ४३१००५ हे असून लिहून घेणार सतिश सोपानराव येरणाळे, वय ५८ वर्षे, धंदा-व्यापार, रा. फ्लॅट नं. ३०२, माऊली अपार्टमेंट, सुतारवाडी पाशान पुणे ४११ ०२१ यांचे विरुद्ध तहसील कार्यालय तुळजापूर या कार्यालयातून निर्गत झाल्याचे भासवणारे बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची व तहसील कार्यालय तुळजापूर यांची फसवणूक केल्याने त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई होणेस फिर्याद आहे.
सदर तक्रार देऊनही आज चार दिवस झाले तरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. पोलीस कश्याची वाट पहात आहेत. त्यांना मलिदा मिळाला का ? असा प्रश्न विचारला जात आहे.
लिपिकाचा प्रताप
हा सर्व प्रताप लिपिक शुभम काळे याने केल्याची माहिती समोर येत आहे. या लिपिकाने तुळजापूर आणि धाराशिव तहसीलमध्ये अनेक काळे कारनामे केल्याचे समोर आले आहे. त्याचा भांडाफोड धाराशिव लाइव्हने केला असून, काळे याची पाचावर धारण बसली आहे.