तुळजापूरमध्ये एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास अधिकाधिक खोलात जात असताना आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. संकेत अनिल शिंदे (रा. तुळजापूर) असे या नव्याने अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ६ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले असून, त्याची बाजारातील किंमत सुमारे ३० हजार रुपये आहे. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आतापर्यंतची स्थिती:
- एकूण आरोपी: १६
- अटक आरोपी: १०
- फरार आरोपी: ६
फरार आरोपींची नावे:
- स्वराज उर्फ पिनू तेलंग (तुळजापूर)
- वैभव गोळे (मुंबई)
- आणि अन्य चार आरोपी (ज्यांची नावे पोलिसांनी गोपनीय ठेवली आहेत)
अटक आरोपींची यादी:
- संगीता गोळे (मुंबई)
- अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे (तुळजापूर)
- युवराज देविदास दळवी (तुळजापूर)
- संदीप संजय राठोड (नळदुर्ग)
- संतोष खोत (मुंबई)
- विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे (सराटी, भाजप पदाधिकारी)
- सयाजी चव्हाण (तुळजापूर)
- सुमित शिंदे (तुळजापूर)
- ऋषिकेश गाडे (तुळजापूर)
- संकेत अनिल शिंदे (तुळजापूर)
१४ फेब्रुवारीला उघडकीस आलेलं ड्रग्ज रॅकेट
तुळजापूरमध्ये १४ फेब्रुवारी रोजी एमडी ड्रग्जचा साठा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत हे रॅकेट उघडकीस आणले. सुरुवातीच्या तपासात हे एक छोटे नेटवर्क असल्याचा अंदाज होता, मात्र पुढील चौकशीत काही मोठी नावे समोर येऊ लागली आहेत.
विशेषतः भाजप पदाधिकारी विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे यांच्या अटकेमुळे मोठी चर्चा झाली होती. या प्रकरणात काही राजकीय वरदहस्त असलेले लोकही सहभागी असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
तपास अधिक गतीमान, आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता
तपास अधिक तीव्र करण्यात आला असून, या नेटवर्कला पाठीशी घालणाऱ्या ‘बड्या मास्यां’वर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिस अधीक्षक संजय जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर आणि त्यांच्या टीमकडून ही चौकशी केली जात आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.तुळजापूर आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे आहे!