“स्त्री ही अबला नव्हे, तर सबला आहे,” असं आपण वारंवार म्हणतो. पण खरंच, आजची महिला सुरक्षित आहे का? 8 मार्चला “महिला दिन” साजरा करतो, पण त्याच दिवशी कुठेतरी कोणीतरी एका महिलेवर अन्याय होत असतो. मग हा दिवस साजरा करणं हा केवळ एक दिखाऊ सोहळा आहे का?
महिलेच्या सुरक्षिततेचा खरा चेहरा
आजच्या आधुनिक युगात स्त्रिया सर्वच क्षेत्रांत पुढे आहेत – अंतराळ ते सैन्य, पत्रकारिता ते राजकारण. पण त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अजूनही तितकाच गंभीर आहे. कारण…
- घरात असो वा ऑफिसात – सुरक्षिततेला गालबोट
घरातच जर स्त्री सुरक्षित नसेल, तर बाहेर काय अपेक्षा करायची? कुटुंबातील जबरदस्ती, मानसिक आणि शारीरिक छळ, हुंडाबळीच्या घटना अजूनही घडतात. ऑफिसमध्ये ‘कामाचं निमित्त’ सांगून बॉस किंवा सहकाऱ्यांकडून होणारे वाईट अनुभव महिलांसाठी नवे नाहीत. - रस्त्यावर, बसमध्ये, ट्रेनमध्ये…
रात्री उशिरा कामावरून घरी जाणाऱ्या महिलांना “टाईमिंग बरोबर नाही” म्हणूनच गुन्हेगार लक्ष्य करतात. एकटी मुलगी दिसली की ट्रोल करणारी, घाणेरडी भाषा वापरणारी माणसं अजूनही समाजात अस्तित्वात आहेत. - सोशल मीडियावर सुद्धा धोक्याची टांगती तलवार
ऑनलाईन ट्रोलिंग, अश्लील मेसेजेस, मॉर्फिंग फोटोज… सोशल मीडियावर महिलांना धमकावणं, ब्लॅकमेल करणं हे प्रकार सर्रास चालतात.
सुरक्षिततेसाठी महिलांनी काय करावं?
स्त्रीने आता गप्प बसायचं नाही, लढायचं! सुरक्षित राहण्यासाठी कृती करावी लागेल:
- स्वतःची सुरक्षा प्रथम – सेल्फ डिफेन्स शिकावा
कराटे, जूडो, पेपर स्प्रे, छोटा चाकू, टॅझर गन – स्वतःला बचाव करण्यासाठी हत्यारं हवीतच. - स्मार्टफोनचा योग्य वापर
- इमर्जन्सी SOS अलर्ट सेट करावा.
- “लोकेशन शेअरिंग” चालू ठेवा.
- अनोळखी नंबरकडून त्रास दिला गेला तर सायबर सेलकडे तक्रार करा.
- नाही म्हणण्याची हिंमत ठेवा
दबावाखाली, भीतीपोटी कुणालाही ‘हो’ म्हणू नका. आपल्या निर्णयांवर ठाम राहा. - कायद्याचं ज्ञान ठेवा
- महिलांसाठी विशेष कायदे आहेत – POSH कायदा, बलात्कारविरोधी कायदे, सायबर क्राइम कायदे. त्यांचा फायदा घ्या.
- पोलिसांकडे जायला घाबरू नका. FIR नोंदवण्याचा अधिकार वापरा.
- मुलींना लहानपणापासून शिकवा
- “तू मुलगी आहेस, गप्प बस” हे संस्कार बदलायला हवेत.
- “बोलणं,” “प्रतिकार करणं,” “सामर्थ्याने उभं राहणं” हेच खरे संस्कार.
खरं परिवर्तन समाजाने करायला हवं
महिलांनी स्वतःच्या सुरक्षेचं भान ठेवायलाच हवं, पण समाजही जबाबदारी टाळू शकत नाही.
- मुलांना स्त्री-सन्मान शिकवा.
- महिलांना पुरुषांच्या बरोबरीचा मान द्या, “सहन करा” अशी शिकवण नको.
- समाजातील बघ्यांची मानसिकता बदलली पाहिजे – अन्याय दिसला तर विरोध करा!
“सुरक्षितता” हा केवळ शब्द नसून कृती आहे!
महिला सुरक्षित राहतील का? हा प्रश्न महिलांनी विचारायचा नसून, पुरुषप्रधान मानसिकतेने स्वतःला विचारायचा आहे. 8 मार्चच्या पोस्ट्स, स्टेटस, फोटोंपेक्षा, एक दिवस असा येईल का, जेव्हा महिला खरंच सुरक्षित आहेत असं छातीठोकपणे म्हणता येईल? तो दिवस आणण्यासाठी लढायचंय… फक्त महिलांनीच नाही, तर संपूर्ण समाजाने!
– दीपा लोखंडे , पुणे