तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावात सुरू असलेल्या रस्ता कामाने आता नवीन वळण घेतलं आहे. २ कोटींच्या निधीतून सुरू असलेल्या ४०० मीटर लांबीच्या आणि १२ मीटर रुंदीच्या या रस्त्याचे एकेरी बाजूचे ८० टक्के काम पूर्ण झालं असलं तरी, नालीशिवाय हे काम ‘अर्धवट’च राहणार आहे. कारण, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमणाचा विळखा बसला आहे.
ग्रामपंचायत विरुद्ध तहसील कार्यालय – जबाबदारीचे पिंग-पाँग!
ग्रामपंचायत म्हणते, “अतिक्रमण काढणे आमच्या हातात नाही, ते तहसील कार्यालयाचे काम आहे.”
तर तहसील कार्यालय सांगतं, “ग्रामपंचायतीनेच हे काम करावं.”
अशा प्रकारे जबाबदारीची उधळण सुरू असतानाच, स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्याने थेट तहसील कार्यालयात आत्मदहनाचा नाटक करून वातावरण तापवलं! यानंतर तहसीलदारांनी ग्रामपंचायत आणि दुकानदारांना नोटीसही बजावली.
नायब तहसीलदार मयुरा पेरे यांचा ‘गायब’ दौरा!
आज नायब तहसीलदार मयुरा पेरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करायची होती, पण दिवसभर वाट पाहूनही त्या आल्या नाहीत. विशेष म्हणजे, या प्रकरणी त्यांनी याआधी पाहणी टाळली आहे. ही दुसरी वेळ आहे. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या असून, गावकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.
‘रस्ता’ मिळाला पण ‘नाली’ हरवली!
२ कोटींचा खर्च, एकेरी बाजूचे ८०% काम पूर्ण, पण नाली नाही… अतिक्रमण न हटवल्यास रस्त्याचा दर्जा कितपत टिकणार, हा मोठा प्रश्न आहे. तहसील कार्यालय आणि ग्रामपंचायतने जबाबदारी झटकण्याचा खेळ थांबवून प्रत्यक्ष कारवाई केल्याशिवाय अणदूरचा हा ‘रस्ता’ नेमका कुठे जातोय, हे सांगता येणार नाही!