तुळजापूर-लातूर महामार्ग आणि पवनचक्की प्रकल्पाच्या नावाखाली वडगाव लाख (ता. तुळजापूर) परिसरात लाखो ब्रास गौण खनिजाचा ‘खणखणाट’ सुरू असल्याची तक्रार तहसील कार्यालयात दाखल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वतीने श्रीकृष्ण सूर्यवंशी यांनी ही तक्रार करत “सोन्याच्या डोंगराखालची लूट” थांबवण्याची मागणी केली आहे.
परवाना आहे की नाही? ठेकेदारांच्या खेळाचा पर्दाफाश होणार?
महामार्ग आणि पवनचक्कीच्या नावाखाली खनिज उत्खननाचा परवाना घेतलाय की नाही? याचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे. “हे सगळं कायद्याच्या चौकटीत आहे की सरकारी खजिन्याला चुना लावणारा मोठा घोटाळा?” असा सवाल सूर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे.
तिजोरी सरकारची की ‘यांची’?
सूर्यवंशी यांनी “गौण खनिज विभागाच्या अधिकाऱ्यांनी सरकारी तिजोरीऐवजी स्वतःची तिजोरी भरली” असा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे “ही लूट थांबणार की वरतून blessings असलेल्यांचा खेळ सुरूच राहणार?” असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
तहसीलदारांचे आश्वासन, पण कारवाई कधी?
तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी या प्रकरणाची दखल घेत “कारवाई लवकरच केली जाईल” असे आश्वासन दिले आहे. मात्र, “केवळ आश्वासन पुरेसं नाही, प्रत्यक्षात काही घडणार का?” असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.
‘लूट बंद करा, अन्यथा रस्त्यावर येऊ!’
या प्रकरणामुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून “साखर कारखान्यांपासून खाण माफियांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ‘लूट’ सुरू आहे, आता जनता गप्प बसणार नाही!” असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
राजकीय शक्तिप्रदर्शन की खरेच सत्य समोर येणार?
संपूर्ण प्रकरणाचा तपास आणि ठेकेदारांवर कारवाई झाली नाही, तर “हा आणखी एक गाजर दाखवणारा राजकीय स्टंट ठरेल की काय?” अशी चर्चा जनतेत सुरू आहे. आता तहसीलदारांच्या पुढच्या पावलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!