तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावातील श्री खंडोबा देवस्थान परिसरातील रस्त्याचे काम नव्या वादात अडकले आहे. २ कोटींच्या निधीतून सुरू असलेल्या ४०० मीटर लांबीच्या आणि १२ मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम( एकेरी बाजू ) ८०% पूर्ण झाले असले, तरी नालीशिवाय रस्ता, अतिक्रमण हटवण्याची अनिच्छा आणि कामाच्या गुणवत्तेवर उठलेले प्रश्न या सर्वांमुळे हा प्रकल्प अडचणीत आला आहे.
हुतात्मा स्मारकातील डेपोतूनच मातीमिश्रित काँक्रीट?
विशेष म्हणजे, या रस्त्याच्या कामासाठी एम-30 दर्जाच्या काँक्रीटचे काम करणे अंदाजपत्रकात नमूद असताना त्यामध्ये माती मिसळलेली डस्ट वापरली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
एका बाजूचे काम गुणवत्तेशिवाय? मोठ्या साईजची तफावत!
रस्त्याच्या एका बाजूचे काम दर्जाहीन पद्धतीने करण्यात आले असून, त्याच्या साईजमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे काम योग्य प्रकारे झाले आहे का, याची चौकशी तज्ज्ञ गुणविशेष पथकाकडूनच (Technical Inspection Team) झाली पाहिजे, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
ग्रामपंचायत-तहसील प्रशासन एकमेकांकडे बोट!
अतिक्रमण हटवण्याच्या मुद्द्यावरून ग्रामपंचायत आणि तहसील प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.
➡ ग्रामपंचायत म्हणते: “अतिक्रमण हटवण्याचा अधिकार आमच्याकडे नाही, ते तहसील कार्यालयाने करावे!”
➡ तहसील कार्यालय म्हणते: “ग्रामपंचायतीने स्वतःच हे काम करावे!”
नायब तहसीलदारांचा ‘गायब’ दौरा!
आज नायब तहसीलदार मयुरा पेरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करायची होती, पण दिवसभर वाट पाहूनही त्या आल्या नाहीत. विशेष म्हणजे, या प्रकरणी त्यांनी याआधी पाहणी टाळली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून, गावकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
रस्ता दर्जाहीन राहणार की चौकशी होणार?
अणदूरमधील हा रस्ता योग्य दर्जाचा होणार की टोलवाटोलवीच्या गडबडीत टिकाऊपणा गमावणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन गुणवत्तेची चौकशी करावी आणि अतिक्रमणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आता गावकऱ्यांकडून जोर धरत आहे!