तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिराला लवकरच पुरातन झळाळी लाभणार आहे. मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सध्या वेगात सुरू असून, भाविक आणि पुजारी बांधवांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन नियोजित काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हजारो वर्षांच्या अनमोल अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरासह मंदिर परिसरातील उपदेवतांच्या मंदिरांनाही प्राचीन गतवैभवाचे रूप मिळणार आहे. लवकरच राज्यासह देशभरातील देविभक्तांना तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा मूळ प्राचीन गाभारा पाहता येणार असल्याची माहिती तुळजाभवानी मंदिर समितीचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र केवळ मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण राज्याची सांस्कृतिक राजधानी ठरावे इतके महनीय आहे. हा प्राचीन आणि वैभवशाली वारसा देश आणि जगाच्या पर्यटकांसमोर मांडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचे सांगत आमदार पाटील यांनी तिर्थक्षेत्राचा संपुर्ण कायापालट करण्यासाठी दोन हजार कोटींचा आराखडा अंतिम करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
सध्या सुरू असलेली कामे:
- मंदिर समितीच्या स्वनिधीतून 60 कोटी रुपयांची कामे सध्या वेगात सुरू आहेत.
- टोळभैरव मंदिरातील टाइल्स फरशा काढून पुरातन आकार देण्याचे काम पुरातत्त्व विभागाच्या निगराणीखाली सुरू आहे.
- दत्तमंदिराच्या कामांना सुरुवात करण्यात आली असून, जुन्या कोरीव दगडांची साफसफाई सुरू आहे.
- गोमुखतीर्थ आणि परिसरातही जीर्णोद्धाराचे काम वेगात सुरू आहे.
भाविकांसाठी सुविधा:
- भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊन कामाचे नियोजन करण्यात आले आहे.
- ज्येष्ठ आणि दिव्यांग भाविकांच्या सुविधेसाठी लिफ्ट आणि रॅम्पची व्यवस्था केली जाणार आहे.
जिर्णोद्धारात समाविष्ट कामे:
- मंदिरात नव्याने केलेले बांधकाम काढणे.
- भुयारी मार्ग, यज्ञमंडप, सभा मंडप व भवानी शंकर मंदिराचे जतन व दुरूस्ती.
- गोमुखतीर्थ, दत्त मंदिर, मातंगी मंदिर, कल्लोळतीर्थ, निंबाळकर द्वार, मार्तंड ऋषी मंदिर, टोळ भैरव मंदिर, दीपमाळ, शिवाजी महाद्वार व खंडोबा मंदिर, यमाई मंदिराच्या जतन आणि दुरूस्ती.
- तुकोजीबुवा मठाकडील दगडी संरक्षण भिंत, दगडी फरशा, आवश्यकतेनुसार दगडी पायर्या, महावस्त्र अर्पण केंद्राचे जतन आणि दुरूस्ती.
- तुकोजीबुवा मठावरील ओव्हर्या, आराध्य खोली, दगडी फरशी.
- तुळजाभवानी देवीचे मुख्य प्रवेशद्वार व जिजामाता महाद्वाराची दुरूस्ती आणि जतन.