अणदूर – तुळजापूर तालुक्यातील प्रसिद्ध श्री खंडोबाच्या जागृत देवस्थान असलेल्या अणदूर गावात बस स्थानक ते आण्णा चौक या चारशे मीटरच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास निधीतून १ कोटी ३६ लाख रुपये रस्त्याच्या कामासाठी आणि ३२ लाख रुपये जिगजाग लाइटिंगसाठी मंजूर करण्यात आले आहेत.
अणदूर येथील श्री खंडोबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असल्याने येथील रस्त्यावर वाहनांची कोंडी होत आहे. ४०० मीटर लांब आणि १० मीटर रुंद होणाऱ्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. दोन्ही बाजूला दुकानदारांनी अनधिकृत अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे.
रस्ता सिमेंटचा होणार असल्याने अतिक्रमण हटविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अतिक्रमणधारक राजकारण करीत आहेत. अणदूर हे मोठे तीर्थक्षेत्र असून आता कुठे विकास होत आहे. त्यामुळे राजकारण आडवे न आणता हा रस्ता दर्जेदार पद्धतीने करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.