अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर पंचायत समिती गणात सुरू असलेल्या ‘हाय व्होल्टेज ड्रामा’मध्ये अखेरच्या क्षणी मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपचे उमेदवार रणवीर पाटील-चव्हाण यांची वाट मोकळी होणार असे वाटत असतानाच, गणिते पुन्हा बदलली आहेत. आधी ठाम असलेल्या ‘वंचित’च्या उमेदवाराने माघार घेतली असली तरी, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) उमेदवाराने निवडणुकीच्या रिंगणात कायम राहत सत्ताधाऱ्यांच्या ‘बिनविरोध’च्या मनसुब्यांना ‘ब्रेक’ लावला आहे.
‘वंचित’ची माघार : मोठा अडथळा दूर
दोन दिवसापूर्वी “काहीही झाले तरी माघार नाही,” अशी आक्रमक भूमिका घेणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आर. एस. गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. गायकवाड यांच्या या निर्णयामुळे भाजपचे उमेदवार रणवीर चव्हाण यांच्यासाठी मैदान मोकळे झाले असे वाटत होते. …पण ‘मनसे’चे इंजिन आडवे आले!
वंचितचा अडथळा दूर होताच सुटकेचा निःश्वास टाकणाऱ्या भाजपच्या गोटात पुन्हा खळबळ उडाली आहे. ज्यांची मनधरणी सुरू होती, त्या मनसेचे उमेदवार पवन बसवराज घोगरे यांनी मात्र निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास नकार दिला आहे. घोगरे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने रणवीर चव्हाण यांचा ‘बिनविरोध’ निवडून येण्याचा मार्ग आता खुंटला आहे.
पुन्हा नव्याने समीकरणे
-
आधीचे चित्र: काँग्रेसने माघार घेतली होती, मनसेची मनधरणी सुरू होती आणि ‘वंचित’ ठाम होती.
-
आताचे चित्र: ‘वंचित’ने माघार घेतली आहे, पण आता मनसे विरुद्ध भाजप असा सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रणवीर चव्हाण, जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांचे नातू आहेत, त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. मात्र, पवन घोगरे यांनी लावलेल्या या ‘राजकीय ब्रेक’मुळे अणदूर गणात आता एकतर्फी लढत होणार की मनसे काही वेगळा चमत्कार दाखवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






