उमरगा – तालुक्यातील बाबळसुर येथे बैलगाडी हुसकावून लावल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी जगन्नाथ माने (४८, रा. माडज) हे १ सप्टेंबर रोजी संध्याकाळी बैलगाडी घेऊन जात असताना प्रमोद पांडुरंग सुर्यवंशी आणि शंतू भास्कर सुर्यवंशी (दोघे रा. बाबळसुर) यांनी त्यांच्या बैलगाडीला छत्रीने हुसकावून लावले. यामुळे बैल रस्त्यावरून पळाले. माने यांनी त्यांना याबाबत समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच बैलगाडीचे खिळाने मारहाण करून बैलगाडीचे नुकसान केले.
या घटनेनंतर तानाजी माने यांनी ७ सप्टेंबर रोजी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रमोद आणि शंतू सुर्यवंशी यांच्याविरुद्ध भादंवि कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.