धाराशिव: शहरातील सांजा रोडवरील भवानी चौकात मंगळवारी (दि. १०) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हिताची कंपनीचे एटीएम मशीन चोरट्यांनी पळवून नेले. या एटीएममध्ये ५ लाख रुपयांची रक्कम होती. ही घटना सकाळी ८ वाजता उघडकीस आली जेव्हा एटीएमजवळील मेडिकल व्यावसायिकाला एटीएममध्ये संशयास्पद साहित्य विखुरलेले दिसले.
त्यांनी तात्काळ एटीएम मालक संदीप सराफ यांना संपर्क साधला. सराफ यांनी आनंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक अण्णासाहेब माजरे, स्थानिक गुन्हे शाखा आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग बंद केल्याचे आढळून आले. मात्र, शेजारील मेडिकलच्या कॅमेऱ्यात एका छोट्या मालवाहतूक वाहनातून एटीएम मशीन पळवून नेताना दिसत आहे.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. सराफ यांनी आनंदनगर पोलिस ठाण्यात एटीएम चोरीची तक्रार दाखल केली आहे.