बेंबळी – धाराशिव जिल्ह्यातील मेंडसिंगा येथे हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्यामुळे एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुलसी दगडू शिंत्रे (रा. मेंडसिंगा, ता. जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, तिने १८ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेनंतर तिच्या माहेरच्या मंडळींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
अंबिका भैरवनाथ भोंग (वय ३८, रा. समता नगर, औसा, जि. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपी दगडू रामचंद्र शिंत्रे (पती), नंदाबाई रामचंद्र शिंत्रे (सासू), रामचंद्र शिंत्रे (सासरे) आणि विकास रामचंद्र शिंत्रे (दिर) यांनी हुंडा न दिल्याच्या कारणावरून तुलसी यांना सतत छळले. तसेच, लग्नातील मानपान, डोहाळेजेवण व बारश्याचा कार्यक्रम छोटा केल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी बेंबळी पोलिसांनी भा.दं.वि. कलम ८०(२), ८५, १०८, ३५२ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(५) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.