बेंबळी पोलिसांनी गुटखा वाहतूक करणाऱ्या तीन जणांवर कारवाई केली, पण ही कारवाई झाली की केवळ नाटक सादर करण्यात आलं, असा सवाल स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. कारण पोलिसांनी गुटखा पकडला, पण वाहन कुठं गेलं? आरोपींना ताब्यात घेतलं, पण अटक नाही! आता प्रश्न असा पडतो की हे गुटखा व्यापारी माल डोक्यावर घेऊन फिरत होते का?
संपूर्ण प्रकरणात आणखी मजेशीर ट्विस्ट म्हणजे बिट अंमलदार मॅडमचा भाऊच या गुटखा व्यवसायात रंगून गेला होता. त्याने धाराशिवच्या ठोक विक्रेत्याकडून माल उचलून बेंबळी आणि आजूबाजूच्या पानटपऱ्या, हॉटेल्स, किराणा दुकानांना गुटखा पुरवठा करण्याचा सुपारी घेतला होता.
कारवाई की कसरत?
पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून रुईभर पाटीजवळील लोखंडी कमानीजवळ तीन गुटखेबाजांना पकडले. आरोपी प्रशांत टेळे (कनगरा), रोहन लांडे (बामणी) आणि प्रथमेश खटके (नांदुर्गा) यांच्याकडून तब्बल 128 पुडे बादशहा गुटखा जप्त केला गेला. हो, अवघे 128 पुडे! किंमत? फक्त 15,360 रुपये! म्हणजे चोर पकडले, पण चोरीस गेलेले दागिने फक्त कानातले झुमके दाखवून उरलेले सोन्याचे हार गायब करावे, तसाच प्रकार इथे दिसून आला.
गाडी हवी पण गुन्ह्यात नाही!
या गुटख्याची वाहतूक एका कारमधून होत होती. पण जेव्हा एफआयआर लिहिला गेला, तेव्हा गुटखा सापडला, आरोपींची नावे आली, पण गाडीचा उल्लेखच नाही! मग गुटखा चालत आला का? की पोलीस त्याला स्वतःच्या गाडीतून घेऊन आले? यावर अजूनही गूढ कायम आहे.
अटक नाही, थेट जामीन!
अधिक मनोरंजक भाग म्हणजे पोलिसांनी आरोपींना अटक करण्याऐवजी फरार घोषित करून दिले आणि थेट परस्पर जामीन घ्यायला सांगितला! म्हणजे गुन्हा दाखल झाला, पण आरोपी पोलिसांना म्हणाले, “भाऊ, आम्ही जरा घरी जाऊन येतो, नंतर येतो जामीन घ्यायला,” आणि पोलीस म्हणाले, “जा, लवकर या!”
हप्त्याचा हंगामा
आरोपींच्या म्हणण्यानुसार, ते बेंबळी पोलिसांना दरमहा 10,000 रुपये हप्ता देत होते. पण अलीकडे पोलिसांनी तो वाढवून थेट 25,000 रुपये करण्याची मागणी केली. हा नवा दर जड गेल्यामुळे हा सगळा मसाला बाहेर आला.
पोलीस ठाण्यातील प्रेक्षक – प्रेक्षकांचा प्रतिसाद!
या प्रकरणावर लोकांचं मत अगदी रोखठोक आहे –
✅ गुटखा पकडला – पण नेमका किती, ते गुपित
✅ गाडी होती – पण पोलिसांनी गायब केली
✅ आरोपी सापडले – पण अटक नाही
✅ जामीन मिळाला – पण त्याआधी फरार घोषित
शेवटी प्रश्न उरतोच…
ही कारवाई होती की नाटक? “बेंबळी गुटखा नाटिका – एक प्रहसन” असं याचं नाव ठेवलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण शेवटी प्रश्न हाच आहे – गुटखा चालत फिरला का?