धाराशिवच्या शासकीय मेडिकल कॉलेजला तीन वर्षे झाली, पण जागेचा प्रश्न अजूनही “वेंटिलेटर” वर आहे! माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यातील राजकीय द्वंद्वामुळे हा मुद्दा “आयसीयु” मध्ये गेला आहे.
सध्या मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालय एकाच ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे कॉलेजच्या डीन डॉ. शिल्पा डोमकुंडवार आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चाकूरकर यांच्यात “बडा कौन ?” ची जुंपली आहे. पण वाद काहीही असो, “कमिशन खाने” यावर मात्र एकमत दिसतंय!
“जागा नाही” चा बहाणा, मशीन मात्र हलवायला सज्ज!
मेडिकल कॉलेजसाठी मंजूर एमआरआय मशीन धाराशिवच्या रुग्णांना मिळण्याऐवजी सरळ इचलकरंजीला हलवण्यात आलं. कारण काय? तर डीन मॅडमने जागा नाही असा “साक्षात्कार” केला आणि आरोग्य विभागाने लगेच आदेश काढला!
हीच “विद्या” शल्य चिकित्सक चाकूरकर यांनीही अवलंबली. तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजूर सिटी स्कॅन मशीन सरळ लोणावळ्याच्या थंड हवेच्या ठिकाणी रवाना! कारण काय? तर चाकूरकर साहेबांनाही जागेचा तुटवडा जाणवला.
कमिशनची गोडी…मशीनला फोडी!
धाराशिवच्या रुग्णांना सरकारी एमआरआय आणि सिटी स्कॅन मिळाले असते, तर खासगी केंद्रांचं “कमिशन” बंद झालं असतं! हे टाळण्यासाठी डीन आणि शल्य चिकित्सकांनी जागेचा बहाणा काढून मशीन बाहेर पाठवली. आता रुग्णांना खासगी केंद्रात भरमसाट पैसे मोजावे लागतायत आणि साहेब लोक “कमिशन” वर सुखी आहेत!
लोकप्रतिनिधींची भूमिकाही मनोरंजक!
धाराशिव लाइव्हने ही बातमी लावून धरताच आमदार कैलास पाटील यांनी आरोग्यमंत्र्यांना खरमरीत पत्र पाठवलं. पण तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील मात्र “मौन व्रत” पाळून बसले आहेत.
विकासाच्या गप्पा मारणारे, कागदावर आणि थ्रीडी व्हिडिओमध्ये मोठमोठे प्रकल्प दाखवणारे राणा पाटील आता गप्प का? असा सवाल लोक विचारत आहेत. विकास व्हावा की “कमिशन” वाढवावं, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे!