धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंजूर झालेले MRI स्कॅन मशीन इचलकरंजी येथे हलवण्याचा निर्णय होता. तसेच, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजूर सिटी स्कॅन मशीन लोणावळा येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, धाराशिव लाइव्हने या विषयावर प्रकाश टाकताच हा निर्णय अखेर स्थगित करण्यात आला आहे.
धाराशिव लाइव्हने सर्वप्रथम उघड केला मुद्दा
धाराशिव लाइव्हने या निर्णयावर जोरदार आवाज उठवत दिवसभर वृत्तमालिका प्रसारित केली. या वृत्तानंतर जिल्ह्यातील जनतेत संतापाची लाट उसळली. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या मुद्द्यावर त्वरित लक्ष घातले. या हालचालींमुळे आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला निर्णय मागे घ्यावा लागला.
PPP तत्त्वावर मंजूर झालेल्या यंत्रणा अन्यत्र हलवण्याचा निर्णय
आरोग्य विभागाने PPP (Public-Private Partnership) तत्त्वावर कृष्णा डायग्नोस्टिक्स यांच्या सहकार्याने धाराशिव सिव्हिल हॉस्पिटलसाठी MRI मशीन आणि तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयासाठी CT स्कॅन मशीन मंजूर केले होते. मात्र, धाराशिव सिव्हिलमध्ये जागेचा अभाव आणि आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागात समन्वयाचा अभाव असल्याने या मशीन अन्यत्र हलवण्याचे आदेश निघाले होते.
आ. कैलास पाटील यांचा आरोग्यमंत्र्यांना ठणकावणारे पत्र
धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य सुविधांवर अन्याय होत असल्याचे लक्षात येताच आमदार कैलास पाटील यांनी थेट आरोग्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिले. त्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आणि धाराशिव व तुळजापूरमधील रुग्णांना आवश्यक असलेल्या या सेवांचा लाभ मिळावा, यासाठी आग्रही भूमिका घेतली.
अखेर जिल्ह्याला मोठा दिलासा: MRI व CT स्कॅन मशीनसाठी जागेची सोय
धाराशिव लाइव्हच्या प्रभावी पत्रकारितेच्या परिणामस्वरूप प्रशासनाने यासंदर्भात नवा तोडगा काढला. धाराशिवच्या नवीन बिल्डिंगमध्ये 2,000 चौ.फु. जागा MRI मशीनसाठी तर तुळजापूर SDH मध्ये स्वतंत्र 1,500 चौ.फु. हॉल DPDC निधीतून उपलब्ध करून देण्याचे ठरले आहे.
जनतेचा विजय, धाराशिव लाइव्हचा प्रभाव
ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की, पत्रकारितेच्या बळावर प्रशासनाला योग्य निर्णय घेण्यास भाग पाडता येते. धाराशिव लाइव्हच्या वेधक वृत्तांकनामुळे धाराशिव व तुळजापूर जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा विजय जनतेचा असून, योग्य वेळी आवाज उठवणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते.