आंबी – परंडा तालुक्यातील हरणवडा येथे एका भीषण बस अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना दि. २७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता घडली.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पारेवाडी येथील तात्या विरभद्र पाटने हे रोहकल ते परंडा जाणारी एमएच २० बीएल २१०५ क्रमांकाच्या बसमधून प्रवास करत होते. हरणवडा येथे आल्यावर बसचालकाने निष्काळजीपणे बस चालविल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या निलगिरीच्या झाडाला धडकली.
या अपघातात तात्या पाटने हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय कंडारी येथील आनंद हणुमंत घोडके, प्रतिक्षा विठ्ठल पाटील, साक्षी मारुती सोनवणे, नम्रता नागनाथ शिंदे आणि इतर काही प्रवासीही गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर कंडारी येथील आप्पासाहेब शेषनाथ गवळी यांनी आंबी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून बसचालक विठ्ठल दत्तु तौर याच्याविरुद्ध भादंवि कलम २८१, १२५(अ),(ब), १०६(१), ३२४(४) आणि १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
धाराशिव तालुक्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू
बेंबळी: धाराशिव तालुक्यातील ताकविकी शिवारात भीषण अपघात घडला. या अपघातात शंकर चंद्राप्पा मस्के (वय 35 वर्षे, रा. तोरंबा) यांचा मृत्यू झाला.
मस्के हे आपले हॉटेल बंद करून तोरंबा येथे जाण्यासाठी पायी निघाले होते. त्याचवेळी लातूर ते तुळजापूर जाणाऱ्या हायवेवर हॉटेल खंडेराया जवळून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कार (क्रमांक MH 11 BD 9797) ने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत मस्के हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडवून कारचालक जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला.
मयत शंकर मस्के यांच्या पत्नी द्रोपदी मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 281, 106(1) सह 134 (अ)(ब) मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फरार कारचालकाचा शोध सुरू केला आहे.