वाशी – वाशी तालुक्यातील शेंडी येथे एका शेतकऱ्याच्या तुरीच्या ढिगाऱ्यास जाळून ७० हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डिगांबर बापुराव रसाळ याने शेंडी शिवारातील शेतगट क्रमांक २०८ मध्ये आश्रुबा सौदागर गुंजाळ (वय ६५) यांच्या काढून ठेवलेल्या तुरीच्या ढिगाऱ्यास दिनांक २० जानेवारी रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास जाळून नुकसान केले. यात सुमारे २० कट्टे तूर जळून खाक झाली असून त्याचे नुकसान ७० हजार रुपये इतके आहे.
गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात आरोपी रसाळ विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३२६ (एफ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.