शिराढोण – शिराढोण येथील अरिहंत किसान सेवा केंद्र पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने १ लाख १६ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचनमाला उत्कर्ष संगवे (वय ५०, रा. शिराढोण) यांच्या मालकीच्या अरिहंत किसान सेवा केंद्र पेट्रोल पंपावर प्रदीप बब्रुवान मुटकुळे (रा. मोहा) हा पेट्रोल विक्रीचे काम करत होता. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान त्याने पेट्रोल विक्री केलेली १,१६,५०१ रुपयांची रोकड पंपाच्या कार्यालयात जमा न करता चोरून नेली.
याप्रकरणी कांचनमाला संगवे यांनी २० जानेवारी २०२५ रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रदीप मुटकुळे विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.