भूम – मोटरसायकलचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना भूम तालुक्यातील बावी येथे घडली आहे. भागवत राजेंद्र उभे (वय ४०) आणि त्यांचा भाऊ अशोक राजेंद्र उभे यांच्यावर आरोपी बाबा विजय काळे, विजय राजाराम काळे, राजाराम काळे, आरती विजय काळे आणि मोनिका बाबा काळे यांनी लोखंडी रॉडने हल्ला चढवला.
हा हल्ला २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २.३० ते ३.३० च्या दरम्यान घडला. आरोपींनी उभे बंधूंना “मोटरसायकलचा हॉर्न का वाजवतो?” असे विचारले आणि त्यानंतर वाद विकोपाला गेला. आरोपींनी भागवत उभे आणि अशोक उभे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात लोखंडी रॉडने गंभीर वार केले.
याशिवाय, आरोपींनी भागवत उभे यांच्या आई, पत्नी आणि मुलीलाही शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या मारहाणीत उभे कुटुंबातील सदस्य जखमी झाले आहेत.
या घटनेची तक्रार भागवत उभे यांनी भूम पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. आरोपींवर भारतीय दंड संहिता (IPC) कलम १०९, ३३३, ६१ (२), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३५१ (३), १८९ (२), १९०, १९१ (२) सह पोक्सो ॲक्ट कलम १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.