धाराशिव: भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरल्याची घटना धाराशिवमध्ये घडली आहे. रोहिणी गणेश जाधव (वय ३६, रा. शाहुपुरी सातारा) या त्यांच्या पतीसोबत मोटरसायकलवरून येरमाळ्याकडे जात होत्या. वरुडा ब्रीजजवळून जात असताना पाठीमागून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सव्वा दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण (अंदाजे ८० हजार रुपये किंमतीचे) जबरदस्तीने चोरून नेले.
ही घटना सोमवारी (दि. २४ फेब्रुवारी २०२५) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. जाधव पतीसोबत मोटरसायकलवरून प्रवास करत असताना, युनिकॉर्न कंपनीच्या काळ्या रंगाच्या, नंबर नसलेल्या मोटरसायकलवरून तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्या मागे आले. त्यांनी जाधव यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून घेतले आणि तेथून पळून गेले.
या घटनेनंतर रोहिणी जाधव यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.
शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले
शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.