तुळजापूर – शहरातील समर्थ कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन घरांमध्ये घुसून सोने-चांदीचे दागिने आणि एका कारचे टायर व डिक्स असा एकूण २ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना रविवार दिनांक २३ फेब्रुवारीच्या रात्री १२ ते पहाटे ३ च्या दरम्यान घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आनंद नागेश जमादार (वय ३५) यांच्या घरी चोरी झाली. त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. जमादार यांच्या शेजारी राहणारे संपत चंद्रकांत काळे आणि बिभीषण राजाभाऊ साळुंके यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाला, मात्र चोरट्यांना काय मिळाले याची माहिती मिळू शकलेली नाही.
दिलीप मोहनराव चव्हाण यांच्या घरासमोर लावलेली स्विफ्ट कंपनीची कार (एमएच ४३ के १४५९) चे उजव्या बाजूचे एमआरएफ कंपनीचे टायर व डिक्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. या घटनेची नोंद तुळजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चिवरी यात्रेतून दुचाकी चोरी, ६० हजारांचे नुकसान
नळदुर्ग – चिवरी यात्रेतून एका युवकाची दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. मुकेश दिलीप शिरसाट (वय २९, रा. मल्लम हॉस्पिटल समोर, तुळजापूर) यांची अंदाजे ६० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल (एमएच २५ बीडी ४३४७) १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते १०.३० च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.
मुकेश शिरसाट हे चिवरी यात्रेसाठी गेले होते. त्यांनी त्यांची दुचाकी एका ठिकाणी पार्क केली होती. रात्री परत येऊन पाहिले असता त्यांची दुचाकी गायब होती. त्यांनी आसपासच्या परिसरात शोध घेतला, परंतु दुचाकीचा पत्ता लागला नाही. या घटनेनंतर शिरसाट यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.