धाराशिव: धाराशिव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत 200 किलो गोवंशीय मांस जप्त केले आहे. हे मांस विक्रीसाठी घेऊन जात असताना दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मोहम्मद अरशद नवाबोद्दीन अरशद (वय 24, रा. अलीगढ, उत्तर प्रदेश) आणि मोहमृमद अतृतउर रहेमान उर्फ मुशरफ अब्दुल माजिद (वय 21 वर्षे, रा. उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे सध्या धाराशिव शहरातील दर्ग्याजवळ खाजानगर येथे राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10.50 वाजता हे आरोपी टाटा इंडिका कार (क्रमांक एमएच 24 सी 3852) मधून जवळपास 40 हजार रुपये किमतीचे 200 किलो गोवंशीय मांस घेऊन वैरागकडे जाणारे रोडवरील राघुचीवाडी शिवारातील पेट्रोल पंपाजवळ आले होते.
गुप्त माहितीच्या आधारे धाराशिव शहर पोलिसांनी या गाडीची तपासणी केली असता त्यात मांस आढळून आले. पोलिसांनी मांस जप्त करून दोघा आरोपींना अटक केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी शासनाच्या वतीने दोघा आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम 5 (सी), 9 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास धाराशिव शहर पोलीस करत आहेत.