धाराशिव शहरातील रस्त्यांचे काम म्हणजे एक कोडेच झाले आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रस्ता सुधारणा प्रकल्प तब्बल 73 लाख 93 हजार रुपये प्रशासकीय मंजुरी देऊनही चार वर्षांत पूर्ण होऊ शकलेला नाही!
हे काम एकाच मोठ्या कंत्राटदारास न देता तुकडे – तुकडे करून अनेक कंत्रादाराना देण्यात आले आहे.त्यातही काम घेतो एकजण , करतो दुसराच अशी परिस्थती आहे.
थातुरमातुर डागडुजी, नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत!
महात्मा फुले चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रस्त्याचे काम एका जोडगोळीने केले असून, ते अत्यंत निकृष्ट आणि थातुर – मातुर करण्यात केले आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे काम झालेले नाही. खोदकाम कमी करून खडी ऐवजी माती वापरण्यात आली आहे. त्यामुळे खडी उखडली असून धुराळा उडत आहे.
छत्रपती संभाजी महाराज चौक ते आनंद बाजार रस्ता देखील याच पद्धतीने करण्यात आला आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत.रस्त्याच्या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करण्याची मागणी होत आहे.
या कामाला मुहूर्त कधी लागणार ?
आनंद बाजार ते महात्मा फुले चौक मार्ग रखडलेला आहे, काम घेऊन ते न करणाऱ्या कंत्राटदारावर नगर पालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. नगर पालिका अभियंता आणि कंत्रादार यांची मिलीभगत आहे.
या कामात नक्की चूक कुणाची?
- नगर पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्ता रखडला?
- कंत्राटदारांना मोकळे रान मिळाले?
- निधी मंजूर होऊनही रस्ता पूर्ण का नाही?