धाराशिव : वाघोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलभा संजय खडके यांना अपात्र ठरवण्याचा धक्कादायक निर्णय जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी १८ फेब्रुवारी रोजी दिला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 14 (1) (ग) अन्वये हा आदेश काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी हा निकाल सोलापुरला रवाना होण्याआधीच देऊन गेले!
एकाच पक्षात अंतर्गत कुरघोडी!
सुलभा खडके या शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या असून, त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणारे राहुल अनिल सुलाखे हे देखील त्याच पक्षाचे आहेत. त्यामुळे हा पक्षांतर्गत संघर्ष समजायचा का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकरणाची सुनावणी झाली होती आणि त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
अपात्रतेचे खरे कारण काय?
सरपंच खडके यांच्यावर ग्रामपंचायतीच्या निधीतून आपल्या भावाच्या ‘सुजल ट्रेडर्स’ या दुकानातून साहित्य खरेदी केल्याचा आरोप आहे.
- स्मशानभूमी सुधारणा साहित्य : ₹२ लाख
- बंदिस्त नाला बांधकाम साहित्य : ₹४५ हजार
- ग्रामपंचायतीसाठी फर्निचर : ₹१ लाख
एकूणच, ₹३ लाख ४५ हजारांचा व्यवहार खडके यांनी आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
तत्काळ अंमलबजावणी होणार!
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ केली जाणार असून, संबंधितांना याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. आता पुढे काय होणार? अपात्र झाल्यानंतर सरपंच पदावर कोण विराजमान होणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.