धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कैलास (दादा) पाटील यांचा राजकीय प्रवास हा संघर्ष, जिद्द आणि लोकसेवेची शिकवण देणारा आहे. सारोळा (बुद्रुक) या छोट्याशा गावाच्या ग्रामपंचायत सदस्य ,सरपंच ते दोन वेळा आमदारपदाच्या जबाबदारीपर्यंतचा त्यांचा प्रवास राजकीय इच्छाशक्ती आणि लोकसंपर्क कौशल्याचा उत्तम नमुना ठरतो.
राजकीय वाटचालीतील संघर्ष आणि संधी
आमदार कैलास (दादा) पाटील यांनी ग्रामपंचायत सरपंच, जिल्हा परिषदेच्या सदस्यपदावरून समाजकारणाची सुरुवात केली. मात्र, पहिल्या टर्मला संधी नाकारल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि पुन्हा जिल्हा परिषदेत निवडून आले. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आणि शेतीसंबंधी प्रश्नांवर मोठे काम केले, ज्यामुळे त्यांना मोठ्या जनसमूहाचा पाठिंबा मिळत गेला.
विधानसभा निवडणुकीत विजयाची संधी
२०१९ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव-कळंब मतदारसंघातून त्यांना आमदारकीची उमेदवारी दिली आणि त्यांनी विजय मिळवला. पक्षाने त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. त्यांनी नव्या-जुन्या शिवसैनिकांना एकत्र आणत संघटन मजबूत केले आणि जनतेच्या प्रश्नांसाठी झगडण्याचा आपला संकल्प अधिक बळकट केला.
कोविड काळातील सक्रिय योगदान
२०२० मध्ये संपूर्ण देश कोविडच्या संकटात असताना कैलास (दादा) पाटील यांनी मतदारसंघात आपले कार्य थांबवले नाही. खासदार ओमप्रकाश (दादा) राजेनिंबाळकर यांच्या सोबत त्यांनी नगर परिषद आणि ग्रामपंचायतींना मार्गदर्शन केले. आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधत त्यांनी कोविडच्या फैलावाला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले. क्वारंटाईन सेंटरमधील सोयी, औषधांचा पुरवठा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी विशेष लक्ष दिले.
पूरपरिस्थितीतील मदतीचा हात
कोविडच्या संकटातून सावरण्याच्या प्रयत्नात असतानाच धाराशिव-कळंब मतदारसंघाला अतिवृष्टी आणि महापुराचा फटका बसला. नदीकाठच्या गावातील अनेक नागरिक पूरग्रस्त झाले. कैलास (दादा) पाटील यांनी एनडीआरएफ आणि अन्य मदत यंत्रणांना सक्रिय करून अनेक लोकांचे प्राण वाचवले.
शेतकऱ्यांसाठी आक्रमक भूमिका
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत २०२२ मध्ये दीपावलीच्या काळात त्यांनी पीकविमा मिळवण्यासाठी बेमुदत उपोषण केले. यानंतरही ते शांत बसले नाहीत, तर विमा कंपन्यांविरोधात हायकोर्टात लढा देत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून दिली. या निर्णयामुळे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
मतदारसंघाच्या विकासासाठी पुढाकार
विकासकामांच्या संदर्भातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. धाराशिव शहरातील अनेक प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले, अंतर्गत रस्ते आणि नाल्यांच्या कामांसाठी भरघोस निधी मंजूर करून घेतला. या कामांमुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर झाल्या.
कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम आधार
कैलास (दादा) पाटील केवळ राजकारणासाठीच नव्हे, तर सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व म्हणूनही ओळखले जातात. ते कार्यकर्त्यांच्या अडी-अडचणी समजून घेतात आणि त्यांना लढण्यासाठी बळ देतात. त्यामुळेच धाराशिव जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट भक्कमपणे उभा आहे.
जनतेचा पुनश्च विश्वास
गेल्या पाच वर्षातील कार्य पाहून मतदारसंघातील जनतेने त्यांना पुन्हा एकदा आमदार म्हणून विधानसभेत पाठवले. त्यांच्या साधेपणाचा, तळमळीच्या कामाचा आणि सातत्याने जनसंपर्कात राहण्याच्या वृत्तीचा हा सन्मानच आहे.
नेतृत्वाचा नवा अध्याय
आज, त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सुदीर्घ, निरोगी आणि यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा! धाराशिव-कळंब मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांची पुढील वाटचाल अशीच लोकाभिमुख राहील, यात शंका नाही.
प्रशांत (बापू) साळुंके
शहर संघटक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
धाराशिव