धाराशिव जिल्ह्यात बारावी आणि दहावीच्या बोर्ड परीक्षा सुरू असून, काही परीक्षा केंद्रांवर नकलउद्योग चांगलाच फोफावला आहे. प्रशासनाने ‘कॉपी मुक्त’ परीक्षा केंद्रांचा गाजावाजा केला असला तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलट दिसते. काही केंद्रांवर शिक्षक स्वतःच विद्यार्थ्यांना तोंडी उत्तरे सांगत आहेत, तर काही ठिकाणी संगणमताने निकाल जपण्यासाठी हवी तशी मदत केली जात आहे.
‘कॉपी मुक्त’च्या नावावर ‘कॉपी युक्त’ अभियान?
धाराशिव जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर ‘कायदा आणि नियम’ केवळ कागदावर दिसत असून, प्रत्यक्षात मात्र कॉपीचा बाजार मोकळेपणाने सुरू आहे. शाळा बदलल्या, पर्यवेक्षक बदलले, पण निकालाची हमी मात्र टिकवण्यासाठी शिक्षकांनी स्वतः पुढाकार घेतल्याचे चित्र आहे.
विशेषतः घाटंग्री आश्रम शाळा आणि उपळा ( मा. ) येथील हरिभाऊ घुगरे हायस्कूलमध्ये नियमांची पायमल्ली होत असल्याचे समोर आले आहे. येथे पर्यवेक्षकांना डावलून संबंधित शाळेतील विषय शिक्षक स्वतःच विद्यार्थ्यांना तोंडी उत्तरे सांगत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
परीक्षांचे नियमन की ढिसाळ कारभार?
बोर्ड परीक्षा म्हणजे ज्ञानाच्या कसोटीची परीक्षा! मात्र येथे ती कसोटी विद्यार्थ्यांची न राहता व्यवस्थेचीच होत आहे. ज्यांनी विद्यार्थी घडवायचे, तेच शिक्षक जर फसवणुकीचा मार्ग दाखवत असतील, तर उद्याचा समाज कसा घडणार?
‘कॉपी मुक्त’च्या नावावर सुरू असलेल्या या ‘कॉपी युक्त’ मोहिमेवर प्रशासन काय पावले उचलणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.