धाराशिव: शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डीन गंगासागरे यांचा कारभार दिवसेंदिवस वादग्रस्त ठरत आहे. मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानाही हे महाशय धाराशिवला न राहता सोलापूरला ये-जा करतात. शासनाने दिलेल्या सरकारी गाडीचा वापर टाळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून खाजगी वाहनातून प्रवास सुरू आहे. यामुळे टोल नाक्यावरही त्यांच्या प्रवासाची चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे.
सरकारी गाडी, बंगला, सुविधा असूनही सोलापूर मुक्काम!
डीन गंगासागरे यांना शासनाने राहण्यासाठी प्रशस्त बंगला, सर्व सोयींनी युक्त चारचाकी गाडी दिलेली आहे, तरीही ते धाराशिवला न राहता सोलापूर येथेच राहतात. नियमाप्रमाणे त्यांना 24 तास मुख्यालयी हजर राहणे आवश्यक आहे, मात्र त्यांची ही जबाबदारी ते पार पाडताना दिसत नाहीत. यामुळे महाविद्यालय आणि दवाखान्यातील व्यवस्थापन पूर्णपणे ढेपाळले आहे.
HRA घेतात, पण मुख्यालयात हजर नाहीत!
गंगासागरे हे घरभाडे भत्ता (HRA) देखील घेत आहेत, पण प्रत्यक्षात ते धाराशिवला राहात नाहीत. शासनाने दिलेल्या निवासस्थानी न राहता HRA घेणे हे नियमांचे उल्लंघन आहे. त्यांच्याकडून या रकमेची वसुली करावी, अशी मागणी आता होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सरकारी गाडीचा वापर कमी, खाजगी गाडीने प्रवास सुरू!
महाविद्यालय आणि दवाखान्यातील वादग्रस्त घडामोडींच्या बातम्या बाहेर आल्यानंतर गंगासागरे यांनी सरकारी गाडीचा सोलापूर प्रवासासाठी वापर करण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. आता ते खाजगी वाहनातून सोलापूरला ये-जा करत आहेत, त्यामुळे टोल नाक्यावर त्यांच्या प्रवासाची चौकशी होण्याची गरज आहे.
अत्यावश्यक सेवेचा बोजवारा!
डीन गंगासागरे हे मुख्यालयात उपस्थित नसल्यामुळे महाविद्यालय आणि दवाखान्याच्या प्रशासनावर परिणाम झाला आहे. गरजू रुग्णांची गैरसोय होत असून, त्यांच्याकडे लक्ष देणारा जबाबदार अधिकारीच मुख्यालयात नसल्याने अनेक गंभीर निर्णय प्रलंबित आहेत.
डीनवर कारवाई होणार का?
सरकारी नियमांचे उल्लंघन, मुख्यालयी गैरहजेरी, सरकारी वाहनाचा दुरुपयोग टाळण्यासाठी खाजगी गाड्यांचा वापर, आणि अन्यायकारक HRA घेऊन शासनाची फसवणूक – हे सर्व गंभीर प्रकार असून, यावर आता सरकारने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
👉 गंगासागरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल का, की ते अजूनही ‘सोलापूरी पर्यटन’ करत राहतील?