मराठीत एक अत्यंत चपखल म्हण आहे- “कानामागून आले आणि तिखट झाले!” धाराशिव जिल्ह्यातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सध्या याच म्हणीचा रोज प्रत्यय येत आहे. २०१९ मध्ये राष्ट्रवादीतून भाजपच्या गोटात आलेले तुळजापूरचे आमदार राणा पाटील यांनी, संघ आणि भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या जीवावर सलग दोन वेळा आमदारकी मिळवली. पण आता, ज्यांच्या खांद्यावर बसून इथवर पोहोचलो, त्याच कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचा डाव सुरू असल्याची चर्चा धाराशिवच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
‘हुजरेगिरी’ला थारा, निष्ठावंतांना बेदखल!
सध्या राणा पाटील यांचा एक अलिखित नियम झालाय- ‘जे चमचेगिरी करतील, हो ला हो म्हणतील, त्यांनाच जवळ केले जाईल.’ जर कुण्या कार्यकर्त्याने चूक दाखवून देण्याची हिंमत केली, तर त्याला थेट ‘आऊटगोइंग’चा रस्ता दाखवला जाईल. यामुळेच पक्षात ‘नवा गट’ आणि ‘जुना (निष्ठावंत) गट’ अशी उभी फूट पडली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये याचा सर्वाधिक फटका जुन्या कार्यकर्त्यांना बसला. राणा पाटील यांनी आयात केलेल्या आणि मूळच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली. एवढेच नाही, तर ज्या निष्ठावंतांना थेट ‘वरून’ उमेदवारी मिळाली, त्यांना पद्धतशीरपणे पाडण्यातही राणा पाटील गटाचाच हात असल्याचा गंभीर आरोप आता उघडपणे होत आहे.
फडणवीसांचे शिलेदार, पण आजारपणाचा घेतला फायदा?
माजी आमदार सुजितसिंह ठाकूर हे तसे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. २०१९ च्या ‘महाजनादेश यात्रे’त फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केले. एवढेच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यांचे नियोजन करण्यातही ठाकूर यांचा मोठा वाटा असायचा. याच कामाची पावती म्हणून त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली होती.
पण, आमदार असताना ठाकूर काही काळ आजारी पडले आणि राजकारणापासून थोडे दूर गेले. याच ‘गॅप’चा पुरेपूर फायदा राणा पाटील यांनी उचलला आणि पक्षात स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी सर्व आटापिटा केला.
सोशल मीडियावरील ‘सायबर वॉर’ आणि चिरंजीवांची ‘पीआर’ एजन्सी
रविवारी निष्ठावंतांचा मेळावा पार पडल्यानंतर खरी लढाई सुरू झाली ती सोशल मीडियावर! कोणत्याही मीडियाच्या पेजवर जाऊन या मेळाव्याच्या बातम्यांखालील कमेंट्स वाचल्या, तर एक पॅटर्न दिसतो. राणा पाटील यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना शिवीगाळ करणे, ट्रोल करणे आणि त्यांची बदनामी करणे असा एककलमी कार्यक्रम सुरू आहे.
ही सगळी राणा पाटील यांची ‘पिलावळ’ असून, एका खासगी पीआर कंपनीला हे ‘पेड कमेंट्स’ करण्याचे कंत्राट देण्यात आल्याची उघड चर्चा आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण सायबर हल्ल्याचे नेतृत्व राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील करत असल्याचे बोलले जाते.
‘मित्र’ दाखवायचे आणि मागून खंजीर खुपसायचा?
यात सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे, एकीकडे मल्हार पाटील मैत्री दिनाचे (Friendship Day) निमित्त साधून सुजितसिंह ठाकूर आणि ॲड. अनिल काळे यांच्यासोबतचे ‘आम्ही कसे मित्र आहोत’ हे दाखवणारे रिल्स पोस्ट करतात. आणि दुसरीकडे, त्याच नेत्यांना पद्धतशीरपणे ट्रोल करण्यासाठी फौजा सोडल्या जातात! “राणा पाटील यांच्यामुळेच जिल्ह्याला पहिला आमदार मिळाला, ठाकूर-काळेंनी किती सदस्य निवडून आणले?” अशा कमेंट्सचा भडिमार करून जुन्या नेत्यांना डिवचण्याचे काम जोरात सुरू आहे.
“दुसऱ्याच्या सातबाऱ्यावर नाव कशाला? स्वतःचा पक्ष काढा!”
संपर्क मंत्री जयकुमार गोरे यांच्या दौऱ्यात ॲड. अनिल काळे यांचा झालेला अपमान ही बंडाची ठिणगी होती, जी आता वणव्यासारखी पसरत आहे. संतापलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता राणा पाटील यांना थेट ‘ओपन चॅलेंज’ दिले आहे.
“राणा पाटील खरंच इतके दमदार आणि लोकप्रिय नेते आहेत, तर त्यांनी दुसऱ्याच्या पक्षावर कब्जा मिळवण्यापेक्षा, स्वतःचा वेगळा पक्ष काढावा आणि निवडणूक जिंकून दाखवावी! दुसऱ्याच्या कष्टाने तयार झालेल्या ‘सातबाऱ्यावर’ स्वतःचे नाव लावण्याचा प्रयत्न करू नये,” असे जळजळीत आव्हान आता निष्ठावंतांनी दिले आहे.
आता या ‘सातबारा’च्या वादात पक्षाचे वरिष्ठ नेते लक्ष घालणार, की धाराशिव भाजपच्या या महाभारतात आणखी काही नवे अंक पाहायला मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे!
——–
धाराशिव भाजप ‘कुरुक्षेत्र’ भाग-1
धाराशिव भाजपचे ‘कुरुक्षेत्र’: कमळाच्या बागेत ‘प्रायव्हेट लिमिटेड’चा राडा!




