धाराशिव ! पूर्वीचं नाव उस्मानाबाद, हे आपल्या नावामुळेच चर्चेत राहिलं आहे. “सबके बाद उस्मानाबाद” अशी ओळख असलेल्या या शहराने आता “धाराशिव” असं गर्वाने नाव बदललं आहे, पण याचं काहीच फरक पडला नाहीये—प्रश्न , समस्या जैसे थे आहेत!
शहरात शौचालयं नाहीत, पण लघुशंका मात्र मोठ्या प्रमाणात होत आहे… रस्त्यांवर! जणू काही ‘शहराचं नाव बदललंय, पण मुतारींचं नाही’ अशी परिस्थिती. घंटागाडीही नुसती घंटाच वाजवते, पण कचरा उचलायला यायला वेळच नसतो. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांसमोर घंटागाडी येते, आवाज करते आणि निघून जाते. नागरिक मात्र “कचरा आहे, घंटा आहे, पण स्वच्छता नाही!” असं म्हणत आपल्या धुळीनं भरलेल्या हातांनी नाकावर रुमाल धरतात.
आता पाणी पुरवठ्याची गोष्ट सांगायची तर… उन्हाळ्यात दोन आठवड्यातून एकदा पाणी येत होतं. आता तेरणा आणि रुईभर धरणं ओव्हरफ्लो झाली, तरी नळ ओव्हरफ्लो नाहीच! धरणाचं पाणी कसं कुठे जातं, याचा शोध घेणं हे चंद्रावर पाय ठेवण्याइतकं अवघड काम आहे. नागरिकांना मात्र विकतचं पाणी घेऊन हक्काचं पाणी प्यावं लागतं.
धाराशिव नगरपालिकेवर प्रशासक आहेत, पण मुख्याधिकारी लातूरला आहेत! कधी कधी येऊन शहरावर चक्कर मारतात, पण जणू काही धाराशिव शहरात काय चाललंय, त्याचं त्यांना देणंघेणं नाही. नागरिकानी दसऱ्यानिमित्त धुनी-भांडी कधी, कुठे धुतली, हे त्यांना माहित देखील नाही. धाराशिव शहराचं नाव सोनुबाई प्रमाणे बदललं, पण हातात मात्र कथलाचाच वाळा उरलाय!