धाराशिव: जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यांची लाट उसळली असून, विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी, मोटारसायकल चोरी, म्हैस चोरी आणि दागिने चोरीच्या घटना घडल्या आहेत.
उमरगा: गुगळगाव येथील प्रशांत बिराजदार हे देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून ७,१२,००० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे. यामध्ये ५,१४,००० रुपये रोख आणि ८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे.
धाराशिव: राजेंद्र राठोड यांची २५,००० रुपये किमतीची मोटारसायकल कोर्टाच्या पार्किंगमधून चोरीला गेली आहे. तसेच ललिता साखरे यांचे ३०,००० रुपये किमतीचे दागिने बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लंपास केले आहेत.
तामलवाडी: सावरगाव येथील हणमंत जांभळे आणि अनिल गाबणे यांच्या प्रत्येकी ४०,००० रुपये किमतीच्या म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.
कळंब: मैनुद्दीन शेख यांच्या ट्रकमधून ९४,६२२ रुपये किमतीची विस्की चोरीला गेली आहे. चोरट्यांनी ट्रकवरील ताडपत्री फाडून ही चोरी केली.
तुळजापूर: निता महाजन यांचे ९,७५,६५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लंपास केले आहेत.
नळदुर्ग: तानाजी धोतरकर यांची ५०,००० रुपये किमतीची म्हैस शशिकांत घोडके, अतुल कचरे आणि नागनाथ पारवे या तिघांनी चोरून नेल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी सर्व घटनांची नोंद करून तपास सुरू केला आहे.