धाराशिवच्या काळजाला यंदा पडलेले भेगाळलेले तडे १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या आठवणीही फिक्या पाडणारे आहेत. त्या ऐतिहासिक दुष्काळात घोटभर पाणी तरी नशिबी होते, पण यंदा ऐन उन्हाळ्यात जनावरांना आणि माणसांना पिण्यासाठी पाणी मिळेल की नाही, अशी भयानक स्थिती उभी ठाकली आहे. सरासरीपेक्षा कमालीचा कमी पाऊस पडल्याने हाता तोंडाशी आलेले सोयाबीन जागेवर जळून खाक झाले, उसाची वाढ खुंटली आणि वर्षानुवर्षे पोटच्या पोरासारख्या जपलेल्या फळबागा डोळ्यादेखत सुकून निष्प्राण झाल्या. शेतकरी टाहो फोडत आहे, रस्त्यावर उतरून विरोधी पक्ष ओरडत आहेत, पण सत्ताधाऱ्यांच्या संवेदना इतक्या बधिर झाल्या आहेत की त्यांना या आक्रोशाचे केवळ राजकीय इव्हेंटमध्ये रूपांतर करायचे आहे.
मुख्यमंत्र्यांचा धाराशिव दौरा म्हणजे संकटात सापडलेल्या बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरला. करजखेडा येथे पाहणीसाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी पोलिसांनी शेतकऱ्यांची अक्षरशः कपडे उतरवून झडती घेतली. घाम गाळून जगाचे पोट भरणाऱ्या अन्नदात्याची ही विटंबना कशासाठी? शेतकरी म्हणजे काय दरोडेखोर, दहशतवादी अथवा गुन्हेगार आहेत का? कळंब तालुक्यातील मलकापूरमध्ये तर हद्दच झाली; शेतकऱ्यांना जनावरांसारखे दोरखंड बांधून अडवण्यात आले. ‘कोरडा दुष्काळ जाहीर करा’ अशी आर्त हाक देणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेची ही दंडुकेशाही कशाचे लक्षण आहे?

या साऱ्यात सर्वांत मोठा उपहास ठरला तो रस्त्याच्या कडेला मांडलेला ‘टेबल शो’. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर नेऊन जळालेली पिके दाखवण्याऐवजी रस्त्यावर टेबल मांडून त्यावर वाळलेले सोयाबीन दाखवण्यात आले. हे ‘उत्कृष्ट’ नियोजन होते स्थानिक भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे! राष्ट्रवादीत असताना सत्तेच्या मांडवात जे फार्स त्यांनी केले, तीच संस्कृती त्यांनी भाजपमध्ये आणून अधिक जोमाने जोपासलेली दिसते. जर रस्त्यावरील टेबलावरच वाळलेले सोयाबीन पाहायचे होते, तर ते पुडीत बांधून मंत्रालयात मुंबईलाही नेता आले असते; त्यासाठी सरकारी तिजोरीतून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा हा कोट्यवधींचा खर्चिक डोलारा कशासाठी उभारला?
मुख्यमंत्र्यांचा हा दौरा म्हणजे निव्वळ ‘आला वारा, गेला वारा’ असा ठरला. धाराशिवच्या जनतेला तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून थेट मदतीची अपेक्षा होती, पण मुख्यमंत्र्यांनी ‘दोन दिवसांत निर्णय घेऊ’ अशी गुळमुळीत भाषा वापरून काढता पाय घेतला. इकडे मुख्यमंत्र्यांची गाडी निघताच आमदार राणा पाटील आणि त्यांच्या पत्नी, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी ‘दोन दिवसांत दुष्काळ जाहीर होणारच’ असा डंका पिटायला सुरुवात केली. दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांना धक्काबुक्की आणि दमदाटी करताना राणा पाटलांचे व्हायरल झालेले व्हिडिओ पाहिले की प्रश्न पडतो—हे लोकप्रतिनिधी आहेत की मुख्यमंत्र्यांचे बाऊन्सर आणि बॉडीगार्ड?
सत्ता डोक्यात गेली की जनतेचे अश्रूही राजकारण्यांना दिसेनासे होतात. दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांच्या लाठ्या, नेत्यांची दमदाटी आणि टेबलावरचे नौटंकी प्रदर्शन दाखवून जर सरकार त्याची चेष्टा करणार असेल, तर हा उद्रेक उद्या सत्तेची तख्तं उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही. कोरडा दुष्काळ जाहीर करून तातडीने संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी मदत आणि पिण्याच्या पाण्याची सोय करा; अन्यथा शेतकऱ्यांच्या तळतळाटाचे चटके या सरकारला बसल्याशिवाय राहणार नाहीत.
– सुनील ढेपे , संपादक, धाराशिव लाइव्ह





