उमरगा : गोवंशीय जनावरांची कोणतीही चारापाण्याची व्यवस्था न करता त्यांना वाहनांमध्ये दाटीवाटीने भरून वाहतूक केल्याप्रकरणी उमरगा आणि तामलवाडी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत चार वाहनांसह मोठ्या संख्येने गोवंशीय जनावरे ताब्यात घेण्यात आली असून, संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उमरगा पोलिसांच्या पथकाला 4 सप्टेंबर रोजी तलमोड टोलनाका परिसरात गोवंशाची अवैध व कोंबून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पहाटेच्या सुमारास तीन वेगवेगळ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.
पहिल्या कारवाईत महेश ज्ञानेश्वर स्वामी (वय 19, रा. अंबाबाई मंदिराजवळ, लोहारा) याच्या ताब्यातील अशोक लेलँड दोस्त वाहनातून तीन खोंड, दोन बैल आणि तीन कारवड अशी जनावरे आढळली. वाहनाची किंमत सुमारे 1 लाख 60 हजार रुपये, तर जनावरांची किंमत सुमारे 6 लाख 60 हजार रुपये असल्याचे नमूद आहे.
दुसऱ्या कारवाईत कृष्णा गुरुनाथ पांचाळ (वय 28, रा. मुळज) आणि सैफन पाशा फुलारी (वय 32, रा. तुरोरी) यांच्या वाहनातून दोन बैल, एक पारडू आणि एक गाय अशी जनावरे आढळली. वाहनासह जनावरांची एकूण किंमत सुमारे 6 लाख 20 हजार रुपये आहे.
तिसऱ्या कारवाईत पाशा नबीसाहब फुलारी (वय 62) आणि सैफन पाशा फुलारी यांच्या अशोक लेलँड दोस्त वाहनातून चार कारवड, एक खोंड आणि एक वगार अशी जनावरे आढळली. वाहनासह मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 6 लाख 40 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
दरम्यान, तामलवाडी पोलिसांनीही 4 सप्टेंबर रोजी सांगवी पाटी येथे कारवाई केली. बालाजी नारायण बनसोडे (वय 32, रा. उळेवाडी, ता. दक्षिण सोलापूर) याच्याकडून तीन वेगवेगळ्या वाहनांमध्ये तीन गायी, तीन गायी व एक बैल, तसेच दोन गायी व एक वासरू अशी गोवंशीय जनावरे आढळली. वाहनांची किंमत सुमारे 1 लाख 24 हजार रुपये, तर जनावरांची किंमत सुमारे 9 लाख 74 हजार रुपये असल्याचे नमूद आहे.
या सर्व प्रकरणांमध्ये जनावरांसाठी चारापाण्याची व्यवस्था न करता त्यांची वाहनांमध्ये दाटीवाटीने वाहतूक केल्याचे आढळल्याने प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियमातील कलम 11(1)(डी), 11(ई) तसेच प्राण्यांचे परिवहन नियमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तामलवाडी पोलिसांनी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 119 अन्वयेही कारवाई केली आहे.





