धाराशिव: नागरिकांना विविध आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात यासाठी शासन आरोग्य सेवांचे बळकटीकरण करत आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून शस्त्रक्रिया व उपचार मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी आरोग्यविषयक सेवांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी केले.
नळदुर्ग येथे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या व इतर आरोग्य संस्थांचे लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्री श्री. सरनाईक यांच्या हस्ते आज २० फेब्रुवारी रोजी करण्यात आले. यावेळी ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
मंचावर आमदार प्रवीण स्वामी, माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, अपर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी श्री. अहिरराव, लातूर आरोग्य परिमंडळाच्या उपसंचालक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश हरिदास यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सरनाईक म्हणाले की, नळदुर्ग येथे एसटी डेपो व्हावा ही इथल्या परिसरातील गावांतील नागरिकांची मागणी आहे. डेपोसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास नळदुर्ग येथे बस डेपो देण्यात येईल. एसटी राज्यातील दुर्गम भागात जाऊन प्रवाशांची ने-आण करण्याचे काम करते. प्रवाशांना अनेक सुविधा व सवलती देण्याचे काम एसटी करत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रवासी एसटीनेच प्रवास करण्याला प्राधान्य देतात. तुळजापूर या श्री तुळजाभवानी देवीच्या श्रीक्षेत्र असलेल्या ठिकाणी रुग्णांच्या सुविधेसाठी लवकरच कॅशलेस मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात येईल. तेथे रुग्ण व नातेवाईकांना मोफत भोजन तसेच सर्व उपचार देखील मोफत केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी पालकमंत्री श्री. सरनाईक यांनी नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण केले.
मंचावरून ऑनलाईन पद्धतीने बेंबळी येथील ग्रामीण रुग्णालयाचे व सहा ठिकाणी बांधण्यात आलेल्या ब्लॉग पब्लिक हेल्थ युनिटचे उद्घाटन आणि जिल्हा प्रशिक्षण संघ व औषध भांडारगृह बांधकामाचे भूमिपूजन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी केले. संचालन रमेश जोशी यांनी, तर उपस्थितांचे आभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरीदास यांनी मानले. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच नळदुर्ग परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.