धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार असून, इच्छुकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार आणि मंगळवार हे दोनच दिवस शिल्लक असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी तयारी केली आहे.
या निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी महायुती केली आहे, ज्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय रंगत आणखीनच वाढली आहे.महायुतीने धाराशिव जिल्ह्यातील चार जागांपैकी तुळजापूर मतदारसंघ भाजपकडे दिला आहे, तर परंडा आणि उमरगा हे शिवसेना (शिंदे गट) कडे सोपवण्यात आले आहेत. विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आले असल्यामुळे महायुतीने पक्षांतर्गत असंतोषाला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, धाराशिव मतदारसंघात उमेदवारीवरून महायुतीच्या नेत्यांमध्ये काहीसं तणावाचं वातावरण होतं.अखेर हा तिढा सुटला आहे. धाराशिव मतदारसंघ हा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मिळाला आहे , पण उमेदवारीवरून पेच कायम आहे.
धाराशिव मतदारसंघात सध्या उमेदवारीसाठी आठ प्रमुख चेहरे समोर आले आहेत. यात सुधीर पाटील, शिवाजी कापसे, अनिल खोचरे, सूरज साळुंके, धनंजय सावंत, नितीन लांडगे , आणि केशव सावंत यांचा समावेश आहे. तसेच, भाजपचे नितीन काळे यांचे नावही चर्चेत आहे. विशेष म्हणजे, नितीन काळे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास तयार असल्याचे सूचित केले आहे. यासाठी त्यांनी भाजपचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करण्याची तयारी दर्शवली आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाला एक नवं वळण मिळालं आहे.
मुख्यमंत्री शिंदे घेणार अंतिम निर्णय
धाराशिवच्या जागेचा तिढा महायुतीने सोडवला असला तरी उमेदवारीवरून अद्याप संभ्रम कायम आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या तयारीला जोर दिला आहे, मात्र अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.