धाराशिव जिल्ह्यातील प्रशासनाचा ताळेबंद बिघडलेला असताना, नव्या जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वागताला शुभेच्छांपेक्षा जास्त परीक्षा तयार आहेत. कीर्ती किरण पूजार या नावाची अधिकृत घोषणा झाली आणि लगेचच चर्चेला उधाण आले – “या नव्या जिल्हाधिकाऱ्यांचा ‘कीर्ती’ किती टिकेल?”
सोजवळ पण सक्षम?
कीर्ती किरण पूजार यांचा प्रशासकीय प्रवास पाहता ते एक अत्यंत सोजवळ, प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात. गोंडपिंपरी (चंद्रपूर) येथे उपविभागीय अधिकारी, किनवट (नांदेड) येथे आदिवासी प्रकल्प अधिकारी, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी जिल्हा परिषद अशी विविध पदे त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. परंतु जिल्हाधिकारी पदाचा हा त्यांचा पहिलाच अनुभव. एक अधिकारी कितीही प्रामाणिक असला तरी, जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी यंत्रणेवर किती पकड मिळवली, हेच त्यांचे यश ठरवेल.
धाराशिव: एक ‘चॅलेंजिंग’ जिल्हा!
धाराशिव जिल्ह्याची राजकीय आणि प्रशासकीय पार्श्वभूमी पाहता येथे ‘सोजवळ’ अधिकाऱ्यांना फारसा वेळ दिला जात नाही. शासनाने २ हजार कोटींच्या तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला गती द्यायची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. परंतु, आराखड्याला मंजुरी मिळाली तरी ‘कामं लवकर सुरू व्हावीत’ ही धाराशिवकरांची अपेक्षा आहे.
दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचार हा एक उघड गुपित आहे. फाईलींना गती मिळते ती नोटांच्या वाऱ्याने, सामान्य माणूस हेलपाटे मारताना दिसतो. हा सगळा सडलेला कारभार संपवायचा असेल, तर ‘कीर्ती’ यांना लवकरच कठोर पावले उचलावी लागतील.
राजकीय दबावाची कसोटी
धाराशिव जिल्हा म्हणजे राजकीय साखळदंडाने बांधलेला एक ‘प्रयोगशाळा’ आहे. कोणताही अधिकारी येथे कितीही मनापासून काम करायला आला तरी, राजकीय वरदहस्ताशिवाय मोठे निर्णय घेणे कठीण जाते. ओंबासे यांनी काही मोठे निर्णय घेतले, पण ते वादाच्या भोवऱ्यात अडकले. आता कीर्ती पूजार यांना हा दबाव झेलत प्रशासन सुधारायचे आहे.
कीर्ती ठेवायची असेल तर…
✔ कायदा आणि सुव्यवस्थेवर ताबा: गुन्हेगारी, राजकीय हस्तक्षेप आणि पोलिस प्रशासनावरची पकड ही प्राथमिक गरज.
✔ भ्रष्टाचारावर कठोर कारवाई: जिल्हाधिकारी कार्यालयातील दलाली आणि टेबलाखालची अर्थव्यवस्था रोखणे हे पहिल्या १०० दिवसांतच ठरवावे लागेल.
✔ तुळजाभवानी मंदिर विकासाला गती: मंदिराच्या विकासाचे राजकारण न करता, प्रत्यक्ष काम सुरू करण्यावर भर.
✔ सामान्यांसाठी ‘ओपन डोअर’ पॉलिसी: फक्त कार्यालयीन बैठकीत नव्हे, तर जिल्हावासीयांशी थेट संवाद साधून काम करणे.
कीर्ती रचणार की टिकवणार?
धाराशिवचे जिल्हाधिकारी म्हणजे टिकेच्या भडिमारात उभा असलेला माणूस! कीर्ती किरण पूजार यांच्या सोजवळ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाला आता धाराशिवच्या संघर्षमय वास्तवाची जोड द्यावी लागेल.
ही परीक्षा केवळ त्यांच्या प्रशासनाची नाही, तर त्यांच्या नेतृत्वगुणांची आहे. ते ‘कीर्ती’ निर्माण करणार की फक्त टिकवणार, हे लवकरच स्पष्ट होईल! 🚀