धाराशिव शहरातील रस्त्यांची कामे सुरू असताना नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे डांबरीकरणाखाली ड्रेनेज चेंबर बुजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यांची लेव्हल ठरवताना अभियंते चुकले आणि आता ही चूक सुधारण्यासाठी पुन्हा कोट्यवधींचा निधी खर्च केला जाणार आहे.
डांबरीकरणात गटार चेंबर गायब!
शहरातील भूमिगत गटारीचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू असून, डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचा दावा प्रशासन करत आहे. मात्र, खोदलेले रस्ते बुजवताना नियोजनाचा अभाव दिसून आला. परिणामी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा फुले चौक आणि पुष्पक मंगल कार्यालय रोडवरील चेंबर डांबरीकरणाखाली गाडली गेली.
७२ लाख खर्चले, पण चेंबर गायब!
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा फुले चौक आणि आनंद बाजार ते डीआयसी रोडपर्यंतच्या रस्त्यांवर तब्बल ७२ लाख रुपये खर्च झाले.
- मात्र, या रस्त्यांवर ड्रेनेज चेंबर दिसत नाहीत, कारण ते डांबराखालीच दबले आहेत.
- यामुळे नाल्यांचे पाणी रस्त्यावर साचण्याचा धोका निर्माण झाला आहे.
४१ लाख खर्च, चेंबर झाकणं नाहीत!
- धारासूर मर्दिनी ते शम्स चौकादरम्यानच्या रस्त्यावर ४१ लाख रुपये खर्च झाला, पण येथेही चेंबर झाकणं गायब आहेत.
- रात्रीच्या वेळी हे चेंबर न दिसल्याने अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
पुन्हा टेंडर काढून चेंबर उघडणार!
पालिका प्रशासनाने आता नवीन टेंडर प्रक्रिया राबवून चेंबर उघडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारी निधीचा अपव्यय होणार असून, चुकीची जबाबदारी कोणाची यावर मात्र प्रशासन गप्प आहे.
“आता चेंबर उघडू” – प्रशासनाचा दावा
- “काम पूर्ण झाल्यावर चेंबर उघडले जातील.” – जे. विजयकुमार, नगर अभियंता
- “रस्त्याची उंची कायद्याने निश्चित केली पाहिजे, पण या बाबतीत तांत्रिक चुका झाल्या आहेत.” – वाय. एन. स्वामी, अभियंता
धाराशिवकरांनीच विचारले – जबाबदारी कोणाची?
रस्ते सुधारण्याच्या नावाखाली करोडो रुपयांचा खर्च केला जातो, पण चूक झाली की पुन्हा खर्च! हा निधी जाणार कुठे? नागरिकांनी आता याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. चुकीच्या नियोजनामुळे वाहने आणि नागरिकांचे होणारे हाल कधी थांबणार?